
सोलापूर, 13 मार्च (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठा बदल केला आहे. आतापर्यंत तीन, चार आणि पाच दिवसांआड अशा तीन पद्धतींनी होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून आता शहराला फक्त चार आणि पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.तसेच रात्रीचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला असून आता पहाटे ४.३० ते रात्री ११ या वेळेतच पाणीपुरवठा केला जाईल. शहरातील सुमारे ४५ टक्के भागाला चार दिवसांआड, तर ५५ टक्के भागाला पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. ज्या ठिकाणी जलवाहिनी नाही किंवा पाणी पोहोचत नाही, त्या भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेतील पदाधिकाऱ्यांकडून शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र सध्याच्या वितरण व्यवस्थेत तांत्रिक अडचणी असल्यामुळे तीन दिवसांआड पाणी देणे शक्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यानंतर उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा नियोजनात हा बदल करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अभियंता व्यंकटेश चोबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील काही भागांत जलवाहिनी नसल्यामुळे तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड