
रायगड, 13 मार्च (हिं.स.)। पनवेल तालुका पंचायत समितीच्या राजकारणात मोठा राजकीय बदल घडला असून प्रथमच भारतीय जनता पक्षाने येथे सत्ता प्रस्थापित केली आहे. भाजपच्या करंजाडे गणातून निवडून आलेल्या रंजना सदाशिव वास्कर यांची सभापतीपदी, तर आदई गणातून निवडून आलेले भूपेंद्र सदानंद पाटील यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे. या निकालामुळे अनेक दशकांपासून पंचायत समितीवर असलेले शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व संपुष्टात आले आहे.
निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सभापती आणि उपसभापती यांचा मार्केट यार्ड येथे जाहीर सत्कार करण्यात आला.
पनवेल आणि रायगड परिसरात शेतकरी कामगार पक्षाचे अनेक वर्षे वर्चस्व होते. मात्र गेल्या काही वर्षांत राजकीय समीकरणे बदलू लागली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पनवेल शहरासह ग्रामीण भागातही संघटन मजबूत केले. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत भाजपने १६ पैकी तब्बल १५ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला, तर शेकापला एकही जागा मिळवता आली नाही.
सभापतीपदी निवड झालेल्या रंजना वास्कर या भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या कन्या असून त्यांना राजकीय आणि सामाजिक कार्याचा मोठा वारसा लाभला आहे. तर उपसभापती भूपेंद्र पाटील यांनी मागील कार्यकाळात पंचायत समिती सदस्य म्हणून प्रभावी काम केले आहे. या विजयानंतर पनवेलच्या ग्रामीण राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून पंचायत समितीच्या माध्यमातून तळागाळात विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)