
पालघर, 13 मार्च (हिं.स.)। पालघर तालुक्यातील प्रसिद्ध केळवे समुद्रकिनाऱ्याच्या सशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून पहिल्या टप्प्यासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
केळवे समुद्रकिनाऱ्यावर वर्षभर पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मात्र मूलभूत सुविधांचा अभाव, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था तसेच स्वच्छतागृहांच्या अपुऱ्या सुविधांमुळे पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्याच्या सशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत समुद्रकिनाऱ्यावर फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र खुल्या शेडची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्टॉल्सना पर्याय उपलब्ध होऊन किनाऱ्याचे सौंदर्य अबाधित राहण्यास मदत होणार आहे. तसेच समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गाचेही सुसज्जीकरण करण्यात येणार आहे.
या सशोभीकरणामुळे केळवे समुद्रकिनाऱ्याचा चेहरामोहरा बदलणार असून पर्यटनवाढीसोबत स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पर्यटन वाढल्यास परिसरातील लघुउद्योग, खाद्यव्यवसाय तसेच वाहतूक व्यवसायालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या उपक्रमामुळे केळवे समुद्रकिनारा पर्यटन विकासाच्या दृष्टीने अधिक आकर्षक बनणार असून सशोभीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL