
रत्नागिरी, 13 मार्च, (हिं. स.) : चिपळूणमध्ये शनिवारी, दि. १४ मार्च रोजी विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि साहित्यिकांचा सत्कार होणार आहे.
मराठी भाषा दिनानिमित्त चिपळूण पालिकेने आयोजित काव्यवाचन स्पर्धेचे बक्षीस वितरण व साहित्यिकांचा सत्कार सोहळाही शनिवारी सायंकाळी चार वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असून आहेत. त्यांच्या हस्ते पालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष उमेश सपकाळ यांनी दिली.
लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून पालिकेच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खुल्या गटातील काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली होती. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेला उजाळा देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला कवी व साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, प्रा. सुहास बारटक्के, स्मिताताई देवधर, अरुण इंगवले, प्रा. संतोष गोणबरे, मुजफ्फर सय्यद, डॉ. प्रशांत पटवर्धन, राष्ट्रपाल सावंत, धीरज वाटेकर, रवींद्र गुरव, संत साहित्याचे अभ्यासक धनंजय चितळे तसेच प्रकाश (आप्पा) जाधव या मान्यवर साहित्यिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांचा व सहभागी कवींचा गौरव सोहळा या कार्यक्रमात पार पडणार आहे.
हा कार्यक्रम पेठमाप येथे (इंडियन जिमसमोर) आयोजित करण्यात आला असून नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रूपालीताई दांडेकर, मुख्याधिकारी संजय जाधव, तसेच सर्व सभापती व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
मराठी भाषा आणि साहित्याचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमाला चिपळूणमधील विद्यार्थी, साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी