
परभणी, 14 मार्च (हिं.स.)। पाथरी रस्त्यावरील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे गंभीर जळीत जखमी झालेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला यशस्वी उपचार करून नवजीवन देण्यात आले. मंदिरात दिवा लावत असताना साडीला अचानक आग लागल्याने महिलेच्या दोन्ही पायांना गंभीर जखमा झाल्या होत्या. या घटनेत तिच्या शरीराचा सुमारे ३० ते ४० टक्के भाग जळाला होता.
अत्यंत गंभीर अवस्थेत या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी तिची प्रकृती गंभीर असल्याचे ओळखून तातडीने उपचार सुरू केले. सुरुवातीचे पाच दिवस तिला विशेष निगराणीखाली जळीत विभाग (बर्न युनिट) मध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर आवश्यक ती शस्त्रक्रिया करण्यात आली.
रुग्णाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे शासनाच्या आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देत ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर सातत्याने ड्रेसिंग, व्रणसंपादन (वाउंड डेब्रिडमेंट), इन्फेक्शन नियंत्रण, द्रव व्यवस्थापन, पोषण तसेच औषधोपचार देण्यात आले. वैद्यकीय पथकाने रुग्णाच्या प्रकृतीवर सतत बारकाईने लक्ष ठेवले. आधुनिक उपचारपद्धती आणि वैद्यकीय टीमच्या अथक प्रयत्नांमुळे तिची प्रकृती हळूहळू सुधारत गेली आणि अखेर तब्बल एक महिन्यानंतर तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
यावेळी आर.पी. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अॅड. अश्रोबा घाडगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमीर तडवी व स्वप्नील बोर्डे यांनी रुग्णाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. अमीर तडवी यांच्या नेतृत्वाखालील टीमने हे यश मिळवले. डॉ. शिवानी नाईक, डॉ. उर्वशी, डॉ. राम वडकुते आणि डॉ. अपेक्षा शुक्ला यांनी उपचार प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
तसेच समुपदेशक स्वप्नील बोर्डे यांनी रुग्ण आणि तिच्या नातेवाइकांना मानसिक आधार देत उपचार प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावली. या सर्व वैद्यकीय टीमचे रुग्णालय व महाविद्यालयाचे प्रमुख आ. डॉ. राहुल पाटील यांनी अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis