
लातूर, 14 मार्च, (हिं.स.)। वसा समाजप्रबोधनाचा, सन्मान कर्तृत्वाचा! अहमदपूरच्या 'स्वराज्य गणेश मंडळा'चा जिल्हास्तरावर डंका.. उत्सव म्हणजे केवळ विरंगुळा नसून ते समाजप्रबोधनाचे एक भक्कम व्यासपीठ आहे, हे अहमदपूर तालुक्यातील स्वराज्य मित्र मंडळ संचलित, स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाने आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. या मंडळाच्या १७ वर्षांच्या निस्वार्थ सामाजिक सेवेची दखल आता राज्य स्तरावर घेतली गेली असून 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५' मध्ये या मंडळाने लातूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. लातूरच्या जिल्हाधिकारी माननीय वर्षाताई ठाकूर-घुगे यांच्या शुभहस्ते हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला असून यावेळी मंडळाला सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि ४० हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
स्वराज्य गणेश मंडळाने यंदाच्या उत्सवात केवळ भव्य देखावे उभे केले नाहीत, तर समाजाच्या ज्वलंत वास्तवावर प्रकाश टाकला आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना खांद्याला 'जू' लावून नांगर ओढणाऱ्या शेतकऱ्याचा जिवंत देखावा सादर करून मंडळाने बळीराजाच्या कष्टाचे दर्शन घडवले. तसेच आधुनिकतेच्या युगात लोप पावत चाललेल्या 'कांधरा नृत्य' या लोककलेचे सादरीकरण करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. कानठळ्या बसवणाऱ्या डीजे संस्कृतीला फाटा देत, टाळ-मृदंगाच्या आणि 'ज्ञानबा-तुकाराम'च्या जयघोषात शिस्तबद्ध मिरवणूक काढत मंडळाने एक नवा आदर्श घालून दिला. यासोबतच पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना, व्यसनमुक्ती अभियान आणि शैक्षणिक तणाव कमी करण्यासाठी केलेले प्रबोधन यामुळे हे मंडळ खऱ्या अर्थाने उत्कृष्ट ठरले आहे.
हा पुरस्कार केवळ एका मंडळाचा नसून तो संपूर्ण अहमदपूर नगरीच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या हृदयस्पर्शी सोहळ्यावेळी मंडळाचे पदाधिकारी अत्यंत अभिमानाने हा सन्मान स्वीकारताना दिसले. १७ वर्षांच्या या अखंड प्रवासात मंडळाने सातत्याने समाजाच्या हिताचे निर्णय घेतले, ज्याची परिणीती आज या मोठ्या पुरस्कारात झाली आहे.
या प्रसंगी पुरस्कार स्वीकारताना मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष मजगे, तत्कालीन अध्यक्ष शिवराज चोतवे, नरसीमलु पामुलावार, राजू जाधव, रमेश जाधव, राहुल भालेराव, महेश जाधव, राहुल भोसले, फय्यूम शेख, मारुती हेमनर, विनायक नागरगोजे, संकेत गिरी, सतीश बिलापट्टे, देवा उराडे, महेश मोरे, संदीप पांचाळ, राम गंगथडे, आशिष होनराव, गजानन सोमवंशी, विलास पाटील, दत्ता परांडे, दीपक मजगे, ऋषी पामुलावार, पंकज गंगथडे यांसह मंडळाचे सर्व पदाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ऐतिहासिक यशाबद्दल स्वराज्य मित्र परिवाराचे आणि सर्व सदस्यांचे संपूर्ण तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis