अक्षय पात्र फाऊंडेशनच्या अन्नवितरणासाठी इलेक्ट्रिक वाहनांना हिरवा झेंडा
नागपूर, 14 मार्च (हिं.स.) : अक्षयपात्र फाऊंडेशनतर्फे नागपूर केंद्रात अन्न वितरणासाठी नवीन इलेक्ट्रिक वाहनांना शुक्रवारी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या उपक्रमासाठी डॉ. रचना कुलकर्णी आणि डॉ. आनंद कुलकर्णी यांच्या देणगीमुळे हा प्रकल्प साकार झाला आहे. त
नागपुरात अन्नवितरणासाठी इलेक्ट्रिक वाहनांना हिरवा झेंडा दाखवताना अक्षय पात्र फाऊंडेशनचे पदाधिकारी


नागपूर, 14 मार्च (हिं.स.) : अक्षयपात्र फाऊंडेशनतर्फे नागपूर केंद्रात अन्न वितरणासाठी नवीन इलेक्ट्रिक वाहनांना शुक्रवारी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या उपक्रमासाठी डॉ. रचना कुलकर्णी आणि डॉ. आनंद कुलकर्णी यांच्या देणगीमुळे हा प्रकल्प साकार झाला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे मुलांच्या पोषणासाठीच्या उपक्रमाला बळ मिळाले असून अन्न वितरण प्रणाली अधिक पर्यावरणपूरक बनण्यास मदत झाली आहे.

नव्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्यामुळे फाऊंडेशनच्या दैनंदिन अन्न वितरण कार्याला गती मिळणार आहे. ताजे व पोषक अन्न विविध भागांतील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवणे यामुळे शक्य होणार आहे. प्रत्येक वाहनामुळे दररोज सुमारे 2 हजार विद्यार्थ्यांना लाभ होणार असून संस्थेच्या लॉजिस्टिक व्यवस्थेची पोहोच आणि विश्वासार्हता वाढणार आहे.अन्न वितरण व्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच शून्य उत्सर्जन असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामुळे शाश्वतता आणि पर्यावरणपूरक कार्यपद्धतीवर फाऊंडेशनचा भर असल्याचेही अधोरेखित झाले आहे. स्वच्छ इंधन पर्याय स्वीकारत संस्थेने आपल्या वितरण सेवेला पर्यावरणस्नेही दृष्टिकोनाची जोड दिली आहे.

यावेळी अक्षय फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर वेंकट म्हणाले की, डॉ. रचना कुलकर्णी आणि डॉ. आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. त्यांच्या उदार मदतीमुळे मुलांना पोषक अन्न देण्याची आमची क्षमता अधिक बळकट होते. ही इलेक्ट्रिक वाहने केवळ अन्न वाहून नेणार नाहीत, तर मुलांपर्यंत पोषणाची खात्री आणि आत्मविश्वासाने शिक्षण घेण्याच्या संधी घेऊन जातील.नागपूर केंद्रात झालेल्या या कार्यक्रमाला फाऊंडेशनचे प्रतिनिधी व हितचिंतक उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांना गरम आणि पोषक अन्न सातत्याने उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

अक्षयपात्र फाऊंडेशन मागील 25 हून अधिक वर्षांपासून पीएम पोशण स्किमची अंमलबजावणी करत आहे. या योजनेअंतर्गत सरकारी व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचे पोषक जेवण दिले जाते. सध्या संस्था 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये दररोज सुमारे 23.5 लाख विद्यार्थ्यांना भोजन पुरवते. 2030 पर्यंत हा आकडा 30 लाखांपर्यंत नेण्याचा संस्थेचा मानस असून या उपक्रमात नागपूर केंद्राची महत्त्वाची भूमिका आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande