
चंद्रपूर, 14 मार्च (हिं.स.)।
आज सकाळी बंडू धोतरे यांचे सुरू असलेले अन्नत्याग सत्याग्रह पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचे हस्ते नारळपाणी पाजून सोडण्यात आले. प्रमुख मागणी लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्पची वन्यजीव विषयक परवानगी रद्द करण्याबाबत कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन देत या उपोषणाची सांगता करण्यात आली.
दहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर सुरू असलेले अन्नत्याग सत्याग्रह आज सोडविण्यात आले, यावेळी पालकमंत्री यांचेसह आमदार किशोरभाऊ जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक एन रामनुजम, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग उपस्थित होते. यावेळी शासनातर्फे पाठविण्यात आलेले पत्र देत त्यांनी त्याचे वाचन करून दाखविले.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग तर्फे देण्यात आलेल्या पत्रात राज्य वन्यजीव मंडळाच्या ६ जानेवारी २०२६ रोजीच्या बैठकीत उक्त खाण प्रकल्पास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे विविध अटी व शर्तीच्या आधारे शिफारशीत करण्यात आले आहे. तथापि, सदर प्रकल्पाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यास याव्दारे तुर्तास स्थगिती देण्यात येत आहे. तसेच आपल्या मागणीच्या अनुषंगाने लोहारडोंगरी लोहखाण प्रकल्पाची राज्य वन्यजीव मंडळाने दिलेली वन्यजीव विषयक शिफारस रद्द करण्यासाठी पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येईल.तसेच या परिसरातील मानव-वन्यप्राणी संघर्ष निवारणाच्या अनुषंगाने आपल्यामार्फत सादर करण्यात आलेल्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने वनमंत्री यांच्याकडे बैठक आयोजित करण्याचे निश्चित झाले आहे असे नमूद करण्यात आलेले आहे.
यावेळी प्रतिक्रिया देताना बंडू धोतरे म्हणाले की, “उपोषणाच्या मागण्या ह्या पूर्णत: जिल्ह्यातील वन-वन्यजीव संवर्धन सोबतच मानव वन्यप्राणी संघर्ष निवारण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असल्याने आणि सदर आंदोलन व्यक्ती-संस्था पातळीवर न राहता जन आंदोलन झाल्याने त्याची दखल शासनाने घेतली. यान विजयाचे शिल्पकार खरी चंद्रपूरची जनता आहे. यात विविध संस्था-संघटना, पक्ष, समाज संस्था याशिवाय आजचे विद्यार्थी, युवा व महिला यांचा सुध्दा व्यक्तिगत सहभाग थक्क करणारा होता. आंदोलनामागे असलेली जनभावना याचा विचार शासनाने केल्यानेच आज हे आंदोलन खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव