
पालघर, 14 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१’ अंतर्गत आज तहसील कार्यालय, तलासरी येथे महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला आमदार विनोद निकोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच नगराध्यक्ष सुरेश भोये, उपनगराध्यक्ष सुभाष दुमडा, सरपंच तसेच सूत्रसंचालक आणि विविध तालुका विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या महसूल व इतर शासकीय सेवांशी संबंधित प्रश्नांचा तात्काळ निपटारा करण्यावर भर देण्यात आला.
शिबिरामध्ये नागरिकांना ७/१२ उतारे, ८-अ उतारे तसेच विविध दाखले यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय ७/१२ अद्यावत करणे, ई-मोजणी, पाणंद रस्त्यांबाबत कार्यवाही, अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क, अकृषिक सुधारणा मार्गदर्शन, पीएम किसान योजना, दुय्यम शिधापत्रिका वाटप, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, आरोग्य तपासणी, मोफत डिजिटल सातबारा, वनपट्ट्यावर सातबारा नावे नोंद करणे, लक्ष्मी मुक्ती योजना, प्रॉपर्टी कार्ड आदी विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रलंबित कामांचा जलदगतीने निपटारा होत असून शासनाच्या “Single Day Service Delivery” उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय सेवा सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शासनाचा हा उपक्रम सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL