
नाशिक, 14 मार्च (हिं.स.)।
: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक विधानभवन, मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी पुरोहित संघ,नाशिक महानगर पालिका व नाशिक करांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सिंहस्थ कुंभमेळ्यातील ध्वजारोहण सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले. तसेच सिंहस्थ मार्गावरील विविध विकासकामे आणि भाविकांच्या सोयीसुविधांबाबत पुरोहित संघाच्या माध्यमातून निवेदन देत काही महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या.निवेदनामध्ये बारा महिने गोदावरीत स्वच्छ व निर्मळ पाणी वाहते राहावे, विधीमार्गासाठी येणाऱ्या भाविकांना ऊन, वारा व पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी योग्य पूजा सभामंडप उभारावेत, गोदावरी नदीची नियमित स्वच्छता व संवर्धन करण्यात यावे, तसेच भाविकांसाठी आवश्यक त्या सुखसोयी व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या. याशिवाय कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू-संतांसाठी साधुग्राममध्ये उत्तम निवास व इतर सर्व व्यवस्था उत्कृष्ट पद्धतीने करण्यात याव्यात, अशीही मागणी पुरोहित संघाने केली.या बैठकीस कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, छगन भुजबळ,शिवेंद्रराजे भोसले,आमदार राहुल ढीकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हीरे, आमदार सरोज आहीरे, आमदार हिरामण खोसकर, आमदार सत्यजित तांबे,महापौर हिमगौरी आडके, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम,आयुक्त मनिषा खत्री, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, पुरोहित संघाचे अध्यक्ष /विश्वस्त चंद्रशेखर पंचाक्षरी सिंहस्थ समिती अध्यक्ष/प्रमुख विश्वस्त सतीश शुक्ल त्रंबकेश्वर पुरोहित संघाचे मनोज थेटे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी पुरोहित संघाच्या वतीने धार्मिक परंपरा, भाविकांची सुविधा आणि कुंभमेळ्याच्या सुयोग्य व्यवस्थापनाबाबत संघाची भूमिका मांडत वरील सूचना प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या.बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळा भव्य, दिव्य आणि सुयोग्य नियोजनासह पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV