
पुणे, 14 मार्च (हिं.स.)। युद्धजन्य परिस्थितीत केवळ व्यावसायिक गॅसचा पुरवठा थांबविण्यात आला आहे. मात्र, घरगुती गॅसच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. तरीही काही जण या परिस्थितीचा गैरफायदा घेत असून जादा दराने अर्थात गॅसचा काळाबाजार करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, अशी कबुली जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात गॅसचा काळाबाजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा काळाबाजार करणाऱ्यांचे परवाने निलंबित करू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा पुरेशा प्रमाणात असून नागरिकांनी घाबरून जाऊन सिलिंडरसाठी रांगा लावू नयेत, असे आवाहनही केले आहे. सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शहरासह जिल्ह्यातील व्यावसायिक गॅसचा पुरवठ्यात समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे घरगुती गॅसचा पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे परिस्थिती चिघळली असून गॅस सिलिंडरसाठी अनेक ठिकाणी रांगा लागल्या आहेत. व्यावसायिक गॅसचा पुरवठा स्थगित केला असला तरी घरगुती पुरवठ्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. तसेच पुरेशा प्रमाणात पुरवठाही होत असून सध्याचा साठाही पर्याप्त स्वरूपात असल्याचे डुडी यांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु