
पालघर, 14 मार्च (हिं.स.)। पश्चिम रेल्वे मार्गावरील वैतरणा ते डहाणू रोड दरम्यान धावणाऱ्या डहाणू लोकलला सुरू होऊन तब्बल १३ वर्षे उलटली असली तरी प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत लोकलच्या फेऱ्या अपुऱ्या पडत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. दररोज मुंबईकडे कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत असून सफाळे आणि वैतरणा स्थानकांवरील प्रवाशांना गाडीत चढणेही अवघड होत आहे.
गेल्या काही वर्षांत या मार्गावरील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. परिणामी सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी लोकलमध्ये अक्षरशः चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होत असल्याचे प्रवाशांकडून सांगितले जात आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना यामुळे मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत रेल्वेमंत्री, रेल्वे बोर्ड तसेच पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे लोकलच्या फेऱ्या वाढविण्याबाबत अनेक वेळा निवेदने देण्यात आली असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
१ एप्रिलपासून उपनगरीय रेल्वेचे नवीन वेळापत्रक लागू होणार असल्याने या वेळापत्रकात डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्याबरोबरच १५ डब्यांची लोकल सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे. यामुळे गर्दीचा ताण काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रश्नावर सत्ताधारी पक्षासोबतच विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या समस्या जाणून घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करणे, निवेदने देणे तसेच संसद व विधानसभेत हा मुद्दा प्रभावीपणे मांडणे आवश्यक असल्याचे मत प्रवाशांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आगामी वेळापत्रकात प्रवाशांच्या मागण्या कितपत पूर्ण होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL