
सोलापूर, 14 मार्च (हिं.स.)।
गुढीपाडव्याच्या निमित्ताने भाविकांसाठी राबविण्यात येणाऱ्या महाअन्नदासोह सेवेचा ट्रक सोलापूर येथून श्रीशैलमकडे विधिवत पूजन करून रवाना करण्यात आला. शहरातील श्री सिद्धेश्वर सेवा संस्था, सोलापूर यांच्या वतीने गेल्या आठ-नऊ वर्षांपासून श्रीशैलम येथे येणाऱ्या हजारो भाविकांसाठी अन्नदासोहाची सेवा अखंडपणे सुरू ठेवली जात आहे.भुसार गल्ली येथे सायंकाळी सात वाजता आयोजित कार्यक्रमात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते तसेच ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरे हब्बू यांच्या उपस्थितीत ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर अन्नधान्याने भरलेला ट्रक श्रीशैलमकडे प्रस्थान करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक जगदीश पाटील, नगरसेविका ऐश्वर्या गणेश साखरे, नगरसेवक प्रवीण दर्गो पाटील, भाजप युवा नेते पंकज काटकर यांच्यासह उद्योजक शिवानंद वारद, माजी नगरसेवक शैलेंद्र आमणगी, कैलास जेऊरे, सचिन कुलकर्णी तसेच श्री सिद्धेश्वर सेवा संस्थेचे पदाधिकारी, सेवाधारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.गुढीपाडव्याच्या काळात श्रीशैलम येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत अन्नप्रसाद मिळावा, या उद्देशाने ही महाअन्नदासोह सेवा राबविण्यात येत असून, सोलापूरकरांच्या सेवाभावाची परंपरा यामुळे अधिक बळकट होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड