
सोलापूर, 14 मार्च (हिं.स.)।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना जानेवारीनंतर लाभ मिळालेला नाही. आता ज्यांची ‘ई-केवायसी’ चुकली त्याची ३१ मार्चपर्यंत दुरुस्ती सुरु आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात योजनेसाठी तरतूदही झाली आहे. आता योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींनाच नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच १५ एप्रिलपूर्वी फेब्रुवारी व मार्च महिन्याचे प्रत्येकी १५०० रुपये मिळणार आहेत.सोलापूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे सुरवातीला ११ लाख २० हजार ५६३ लाभार्थी होते. त्यानंतर निकषांनुसार लाभार्थींची पडताळणी झाली. त्यात केंद्र व राज्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभार्थी, पुरुष लाभार्थी, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी, कुटुंबात चारचाकी वाहने असलेल्या महिला, २१ वर्षांखालील व ६५ वर्षांवरील महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे. शेवटचा टप्पा म्हणून सर्वच महिला लाभार्थींना ‘ई-केवायसी’ करण्याचे बंधन घालण्यात आले.योजनेच्या निकषांनुसार सोलापूर शहर-जिल्ह्यातील तीन लाख महिला लाभासाठी अपात्र ठरल्या आहेत. आता ‘ई-केवायसी’वरुन ज्या महिला लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांचीही नावे वगळण्यात येणार आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे दीड लाखांहून अधिक महिला अपात्र ठरतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड