
लातूर, 14 मार्च (हिं.स.)। राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज, शनिवार दि. १४ मार्च रोजी बाभळगाव येथील आपल्या निवासस्थानी लातूर शहर व जिल्ह्यातील नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. बाभळगाव निवासस्थानी सकाळपासूनच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी होती. यावेळी आमदार अमित देशमुख यांनी प्रत्येकाशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या सविस्तरपणे जाणून घेतल्या. नागरिकांनी दिलेल्या विविध निमंत्रणांचा त्यांनी स्वीकार केला, तसेच नागरिकांच्या प्रलंबित कामांबाबत आणि समस्यांबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
लातूर शहर महानगरपालिकेत महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर स्नेहल उटगे, गटनेते विजयकुमार साबदे, यानंतर स्थायी समिती, परिवहन समिती तसेच स्वीकृत सदस्यांची निवड झाल्याच्या निमित्ताने शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभय साळुंखे व शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी बाभळगाव निवासस्थानी येऊन आमदार देशमुख यांचे आभार मानले.
यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना आगामी कारकिर्दीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, हमीद शेख, डॉ. अरविंद भातांबरे, अजित माने, भालचंद्र सोनकांबळे, नगरसेवक इसरार सगरे, नगरसेवक अभिषेक पतंगे, व्यंकटेश पुरी, मुख्तार शेख, सचिन सूर्यवंशी, मनोज स्वामी, राजकुमार पाटील, दत्ता सोमवंशी, संभाजी सिंदगे, रवी सिंदगे, खंडू पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे अभिनंदन लातूर पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झालेले श्री श्रीकांत बैले व उपसभापती श्री महेश चव्हाण यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. लातूर तालुक्यातील जनतेने काँग्रेस पक्षावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी नूतन पदाधिकारी व त्यांचे सर्व सहकारी परिश्रम घेतील असा विश्वास व्यक्त केला. तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विविध विकास योजना राबवण्याच्याकामी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन आमदार देशमुख यांनी याप्रसंगी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis