येवल्यात गढूळ पाण्याचा प्रश्न; महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून पंपिंग स्टेशनची पाहणी
प्रशासनाला तातडीने दुरुस्तीचे निर्देश; नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका, पदाधिकाऱ्यांचा इशारा नाशिक, 14 मार्च, (हिं.स.)। येवला शहरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना अत्यंत गढूळ आणि दूषित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. या समस्येमुळे नागरिका
Muddy water issue on the agenda


प्रशासनाला तातडीने दुरुस्तीचे निर्देश; नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका, पदाधिकाऱ्यांचा इशारा

नाशिक, 14 मार्च, (हिं.स.)। येवला शहरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना अत्यंत गढूळ आणि दूषित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. या समस्येमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून आज भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील मुख्य जलशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशनला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विविध भागांत नळाला दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत महायुतीच्या नेत्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन जलवाहिनी आणि पंपिंग यंत्रणेची सखोल तपासणी केली. शहरात ज्या ठिकाणी जलवाहिन्या (पाईपलाईन) फुटल्या असतील किंवा व्हॉल्व्हमध्ये तांत्रिक बिघाड झाला असेल, त्या ठिकाणी तातडीने युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याचे निर्देश पालिकेच्या संबंधित विभागाला देण्यात आले.

आरोग्याबाबत तडजोड नको असा ठाम पवित्रा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

शहरातील जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. येवला नगर पालिकेने तांत्रिक दोष दूर करून शहरवासीयांना तात्काळ स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी आग्रही मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली.

येत्या काही दिवसांत दुरुस्तीची कामे पूर्ण होऊन शहरवासीयांना दिलासा मिळेल, अशी ग्वाहीदेखील यावेळी देण्यात आली.या पाहणी दौऱ्यावेळी शिवसेना गटनेते तथा नगरसेवक गणेश शिंदे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडीया, शिवसेना शहरप्रमुख विशाल परदेशी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख अमोल शिंदे, भाजप तालुकाप्रमुख नानासाहेब लहरे, अक्षय राजपूत यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते आणि पालिकेचे संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande