
बीड, 14 मार्च (हिं.स.)। एकता फाउंडेशन, म.सा.परिषद व समस्त पाडळीकरांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ८ वे एकता मराठी साहित्य संमेलन पाडळी येथे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संपन्न होणार असून या संमेलनाच्या उद्घाटकपदी सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची एकमताने निवड करण्यात आल्याची घोषणा साहित्य संमेलन समन्वय समितीने केली आहे.
गेल्याच आठवड्यात पाडळीतील गावकऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी आमदार अॅड. उषाताई दराडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली असून संमेलनाचे पुढील नियोजन करण्यासाठी येत्या रविवारी गावातील सर्वच प्रतिष्ठित नागरिकांसोबत एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले
असल्याची माहिती एकता फाउंडेशन आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना दिली. दि.२४ मार्च रोजी संमेलनाची सुरवात संमेलनाध्यक्ष मा. आ. उषाताई दराडे यांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता निघणाऱ्या ग्रंथदिंडीने होत असून यात खालापुरी केंद्रातील लिंबा शाळेमधल्या विद्यार्थीनींसह पाडळीकर ग्रामस्थांचे लेझीम पथक, प्रा. शाळा पाडळी व पाडळी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह परिसरातील शाळांचे महापुरुषांच्या वेशातील अश्वारूढ विद्यार्थी अन् कलशधारी विद्यार्थीनी पथक, विठ्ठल वारकरी संस्थेच्या विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांचे भजनी मंडळ, साहित्यप्रेमी नागरिक यांचा समावेश असेल. तद्नंतर मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता उद्घाटन समारंभ सुरू होईल. याच सत्रात जागतिक किर्तीचे
व्यंगचित्रकार सुहास पालिमकर आणि दिपक महाले यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनाचे व अनुराधा प्रकाशनाच्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी जीवनगौरव, राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यकृती, आदर्श शिक्षक, समा जसेवक, पत्रकार, कर्तुत्ववान महिला पारितोषिक वितरण सोहळा पार पडेल. भोजनानंतर डॉ. अनिलसिंह तिवारी हे महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम सादर करणार असून नंतर लेखक आपल्या भेटीला, निमंत्रितांचे कविसंमेलन (भाग-१) तर सायंकाळच्या सत्रात तागडगाव केंद्रातील प्राथमिक शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिल्या दिवसाची सांगता होईल.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis