
पालघर, 14 मार्च, (हिं.स.)। हरित वाढवण बंदर, चौथे मुंबई प्रकल्प, सिडको नवनगर, मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई–बडोदा एक्सप्रेसवे, प्रस्तावित वाढवण विमानतळ तसेच मुंबई–दिल्ली समर्पित रेल्वे मालवाहतूक कॉरिडॉर (डीएफसी) यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा विकासाच्या नव्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. आगामी पाच वर्षांत या प्रकल्पांमुळे पालघर जिल्ह्याचे नाव जागतिक नकाशावर ठळकपणे उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई–बडोदा एक्सप्रेसवे मुळे पालघर जिल्हा देशातील प्रमुख औद्योगिक शहरांशी थेट जोडला गेला आहे. या मार्गामुळे ग्रामीण भागालाही विकासाची नवी दिशा मिळणार असून शेतीमाल थेट बाजारपेठेत पोहोचविणे सुलभ होणार आहे. तसेच कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठीही प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.
मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे बोईसर आणि पालघर परिसरात नागरी तसेच औद्योगिक विकासाला वेग मिळण्याची अपेक्षा आहे. जलद संपर्कामुळे आयटी, स्टार्टअप आणि सेवा उद्योगांना चालना मिळेल. तसेच जमीन व्यवहार वाढून गृहनिर्माण प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, डहाणू तालुक्यातील वाढवण येथे सुमारे ७७ हजार कोटी रुपयांचा प्रस्तावित बंदर प्रकल्प देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक ठरणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन लॉजिस्टिक पार्क, वेअरहाऊस आणि कंटेनर टर्मिनल्स उभारले जाणार आहेत. यामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
प्रस्तावित वाढवण विमानतळामुळे पालघर जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्याची अपेक्षा आहे. आयात-निर्यात व्यवसायाला चालना मिळून पर्यटन व हॉटेल उद्योगालाही गती मिळेल.
राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून पुढील काही वर्षांत पालघर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा आराखडा तयार करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले. त्यामुळे सागरी, औद्योगिक आणि आदिवासी भागांचा समतोल साधत पालघर विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करणार असल्याचे चित्र आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL