
- दिग्दर्शक बालाजी दामुके यांना उत्कृष्ट दिग्दर्शन
परभणी, 14 मार्च (हिं.स.)।
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने अमरावती येथे झालेल्या अंतिम राज्य बालनाट्य स्पर्धेत परभणीच्या गोपाला फाउंडेशनच्या ‘मोतीचूर’ या बालनाट्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत दिग्दर्शक बालाजी दामुके यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचा तृतीय पुरस्कार मिळाला असून सई आशिष चिटणीस हिला अभिनयाचे रौप्यपदक तर आर्यश पैठणे याला अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे.
आशिष चिटणीस कला अकादमी प्रस्तुत व गोपाला फाऊंडेशन, परभणी यांच्या वतीने अंतिम राज्य बालनाट्य स्पर्धेत रमेश पवार लिखित आणि बालाजी दामुके दिग्दर्शित ‘मोतीचूर’ हे बालनाट्य सादर करण्यात आले. या नाटकात शौर्य गायकवाड, आर्यश पैठणे, स्वरा कुलकर्णी, आरोही जोंधळे, शाक्यल कमलापूरकर, साईराज गायकवाड, राजनंदिनी, सोहन कदम, सर्वेश चिटणीस, सई चिटणीस, आर्या शिवलाड, क्षितिज दामुके आणि प्रथमेश कुलकर्णी यांनी भूमिका साकारल्या.
तांत्रिक विभागात नेपथ्य – विरेन दामुके, रवि शिवलाड; प्रकाश योजना – नारायण त्यारे, अजय रिक्षे; वेशभूषा – साक्षी ढवळे, तेजस्विनी दामुके; रंगभूषा – मनस्वी ढवळे, विनायक बनसोडे; तर संगीत – दिनेश नरवाडे आणि तेजस पारधे यांनी जबाबदारी सांभाळली.
या यशाबद्दल सर्व कलाकारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ॲड. अशोकजी सोनी, विजय करभाजन, प्रा. रविशंकर झिंगरे, प्रा. नवनाथ सिंगापूरे, किशोर पुराणिक, संजय पांडे, सुनील ढवळे, अरविंद शहाणे, किरण डाके, हरिभाऊ कदम, बालरंगभूमी परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य त्र्यंबक वडसकर तसेच गोपाला फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष खराटे व इंजि. पवन निकम यांचे मार्गदर्शन लाभले.
परभणीचा दबदबा कायम
हौशी राज्य नाट्य स्पर्धा आणि बालनाट्य स्पर्धांमध्ये परभणीतील नाट्यकलावंतांचा दबदबा कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अनेक वेळा अंतिम फेरीत पोहोचलेल्या परभणीच्या संघाने यावर्षी ‘मोतीचूर’ या बालनाट्याच्या माध्यमातून राज्यात तिसरा क्रमांक पटकावत नवा इतिहास घडवला आहे. या यशामुळे परभणीच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis