
सोलापूर, 14 मार्च (हिं.स.)।
जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांना निवेदन देत सोलापूर शहर व ग्रामीण भागासाठी वाढीव धान्य इष्टांक मंजूर करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शासन निर्णय क्र. असुका-२०२५/प्र.क्र.१६/नापु-२८ दि. १ एप्रिल २०२५ अन्वये सोलापूर शहरासाठी प्राधान्य कुटुंब योजना (PHH) अंतर्गत ५,१५,९९४ तर सोलापूर ग्रामीण भागासाठी १६,२५,२३४ इतका इष्टांक निश्चित करण्यात आला आहे. मात्र शासनाने निश्चित केलेला हा इष्टांक अत्यंत अपुरा असल्याने मोठ्या प्रमाणात पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहत असल्याच्या तक्रारी रेशनकार्डधारकांकडून सातत्याने येत असल्याचे खासदारांनी निवेदनात म्हटले आहे.
सद्यस्थितीत सोलापूर शहरात इष्टांक शून्य असल्याचे दिसून येत असून सोलापूर ग्रामीणमधील ११ तालुक्यांमध्ये केवळ १७,६०८ इतकाच इष्टांक शिल्लक आहे. त्यामुळे अनेक पात्र कुटुंबांना प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभ मिळू शकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरासाठी ५०,००० (अक्षरी : पन्नास हजार) आणि सोलापूर ग्रामीणसाठी ३,००,००० (अक्षरी : तीन लाख) इतका वाढीव इष्टांक तातडीने मंजूर करण्यात यावा, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच सोलापूर शहर व ग्रामीण भागातील संबंधित माहितीही शासनाकडे सादर करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड