
पुणे, 14 मार्च (हिं.स.)।
महापालिकेच्या पाणीपट्टीवसुलीत मागील दोन आर्थिक वर्षांच्या तुलनेत यंदा घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 42.98 टक्के पाणीमीटर बंद किंवा नादुरुस्त असल्याने पाणी वापराची अचूक नोंद होत नसून, त्याचा थेट परिणाम वसुलीवर होत आहे. यामुळे महापालिकेच्या अपेक्षित उत्पन्नावर परिणाम झाला असून, थकबाकी देखील वाढली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरात पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विविध कामे सुरू आहेत. महापालिकेच्या हद्दीसह छावणी परिसराला देखील पाणीपुरवठा करताना पाणीपुरवठा विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणीसुद्धा वाढली आहे. त्यात पाणीगळतीमुळे पाण्याचा अपव्यय वाढला आहे. ही गळती रोखण्यासाठी पाणी मीटर बसवले जात आहे. मात्र, शहरासह हद्दीच्या बाहेरील 42.98 टक्के मीटर नादुरुस्त आहेत. यामुळे पाण्याचा अचूक वापर होतो की नाही याबाबत माहिती मिळत नसल्याने त्याचा परिणाम पाणीपट्टीवसुलीवर झाला आहे. त्यामुळे नादुरुस्त मीटर बदलून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु