
पुणे, 14 मार्च (हिं.स.)। पुणे जिल्हा परिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तांत्रिक अडचणीत सापडला असून, तो प्रशासकांकडूनच मंजूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १८ मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड होणार असली, तरी २७ मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर करणे बंधनकारक असल्याने आवश्यक असलेला अजेंडा कालावधी उपलब्ध होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद सभा नियमावलीनुसार नियमित सभा बोलावण्यासाठी किमान १७ दिवस आधी सूचना पत्र देणे आवश्यक असते, तर तातडीची सभा बोलवण्यासाठीही किमान १२ दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. मात्र अध्यक्ष निवड १८ मार्चला होत असून शासनाच्या निर्देशानुसार २७ मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर करणे आवश्यक आहे. त्यामुळे अध्यक्ष निवडीनंतर उपलब्ध कालावधी अवघा नऊ दिवसांचा राहतो. परिणामी, नियमांनुसार या कालावधीत सर्वसाधारण सभा घेणे शक्य नसल्याने ही तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु