परभणी - ट्रेनमध्ये राहिलेली प्रवाशाची बॅग आरपीएफने शोधून सुरक्षित केली परत
परभणी, 14 मार्च, (हिं.स.)। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) नांदेड विभाग सतत दक्षतेने कार्यरत असून विविध विशेष मोहिमांद्वारे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करत आहे. त्याचाच एक भाग म
परभणी - ट्रेनमध्ये राहिलेली प्रवाशाची बॅग आरपीएफने शोधून सुरक्षित केली परत


परभणी, 14 मार्च, (हिं.स.)। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) नांदेड विभाग सतत दक्षतेने कार्यरत असून विविध विशेष मोहिमांद्वारे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ आणि ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत आरपीएफने चोरीचा प्रयत्न करणा-या संशयिताला पकडले तसेच प्रवाशाची हरवलेली बॅग सुरक्षितपणे परत करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत नांदेड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर फूट ओव्हर ब्रिजजवळ सीआयबी-डी अँड आय नांदेड व जीआरपी नांदेडचे कर्मचारी संशयितांवर लक्ष ठेवून गस्त घालत होते. यावेळी हेड कॉन्स्टेबल के. बालाजी, हेड कॉन्स्टेबल एम. जी. चौहान आणि कॉन्स्टेबल अजीत सिंह यांनी सोनू (वय 25 वर्षे, रा. नांदेड) याला प्रवाशांचे सामान चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना रंगेहाथ पकडले. यानंतर संबंधित संशयिताला पुढील कायदेशीर कारवाईसाठी जीआरपी नांदेड यांच्या ताब्यात देण्यात आले असून महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 110 व 117 अंतर्गत गुन्हा क्रमांक 19/2026 नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत रेल्वे क्रमांक 12787 एक्सप्रेसमध्ये राहिलेल्या बॅगेबाबत डीएससीआर नांदेड येथे तक्रार प्राप्त झाली. तक्रार मिळताच आरपीएफ नागरसोल येथील कॉन्स्टेबल प्रविण कुमार यांनी संबंधित ट्रेन नागरसोल स्थानकावर आल्यानंतर एस-7 डब्यात शोधमोहीम राबवली. या शोधादरम्यान त्यांना एक तपकिरी रंगाची मिनी हँडबॅग मिळून आली.

सदर बॅग आरपीएफ पोस्ट नागरसोल येथे सुरक्षित ठेवण्यात आली. पुढील तपासात ही बॅग विजयवाडा येथील मोहम्मद जिलानी यांची असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी भीमावरम टाउन ते चेरलपल्ली असा प्रवास करताना चुकून ती बॅग ट्रेनमध्येच राहिली होती. या बॅगेमध्ये 3,600 रुपये रोख रक्कम, सुमारे 15,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन, दोन चष्मे, एटीएम कार्ड, ओळखपत्रे तसेच इतर वैयक्तिक कागदपत्रे असा एकूण सुमारे 21,000 रुपये किमतीचा माल होता.

प्रवाशाची ओळख आधार कार्डद्वारे पडताळून सदर बॅग त्यांना सुरक्षितपणे परत करण्यात आली. आरपीएफच्या तत्परतेबद्दल आणि प्रामाणिक सेवेमुळे आपला मौल्यवान माल सुरक्षित परत मिळाल्याबद्दल संबंधित प्रवाशाने आरपीएफचे मनापासून आभार मानले. या कारवायांमुळे आरपीएफ नांदेड विभागाची प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतची जागरूकता, जबाबदारी आणि सेवाभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande