मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापकांच्या 73 जागांसाठी ऑनलाईन अर्जाला मुदतवाढ
छत्रपती संभाजीनगर, 14 मार्च (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक प्रवर्गाच्या ७३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी २० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुर्वी अर्ज केलेल्यांना नव्याने अकॅडमिक आणि रिसर्च क्रेडेन्शि
मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापकांच्या 73 जागांसाठी ऑनलाईन अर्जाला मुदतवाढ


छत्रपती संभाजीनगर, 14 मार्च (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक प्रवर्गाच्या ७३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी २० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुर्वी अर्ज केलेल्यांना नव्याने अकॅडमिक आणि रिसर्च क्रेडेन्शियल्स (एआरसी) भरावा लागणार असून नवीन उमेदवारांना देखील अर्ज दाखल करता येईल, अशी माहिती कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी दिली.

महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठातील अध्यापकांच्या निवड प्रक्रिया राबविण्यात बाबत राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने ११ फेब्रुवारी २०२६ रोजी कार्यपध्दती संदर्भात शासन आदेश जारी करण्यात आला. शासनाच्या या नवीन नियमावली व कार्यपध्दतीप्रमाणे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून या नुसार ’एआरसी’ भरण्यासंदर्भात निश्चिती करण्यात आली. ६०ः२०ः२० या प्रमाणे अकॅडमिक रेकॉर्ड, अध्यापन कौशल्ये व मुलाखत असे प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपुर्ण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शिक्षक प्रवर्गातील ७३ जागांमध्ये मुख्य परिसर तसेच धाराशिव उपपरिसरातील जागांचा समावेश आहे. यामध्ये मानव्यविद्या, वाणिज्यशास्त्र, आंतरविद्याशाखा व विज्ञान तंत्रज्ञान या चारही विद्याशाखेतील जागांचा समावेश आहे. यामध्ये प्राध्यापक प्रवर्गातील आठ तर सहयोगी प्राध्यापक पदाच्या १२ जागांचा समावेश आहे. तर सहाय्यक प्राध्यापकांच्या ५३ जागां आहेत. या जागांसाठी आता केंद्र शासनाच्या समर्थ पोर्टलच्या माध्यमातून २० मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर २५ मार्च पर्यंत आस्थापना विभागात दोन प्रतीत हार्ड कॉपी दाखल करता येणार आहे. यापूर्वी २०२५ मध्ये ज्या उमेदवारांनी आवेदन दाखल केले आहेत. त्या सर्वांनाही अकॅडमिक अॅण्ड रिसर्च केडेन्शियल प्रमाणे ’एआरसी’ फॉम ऑनलाईन व हार्डकॉपी जमा करणे बंधनकारक आहे, असेही अस्थापना विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे. या जाहिरातील चारही विद्याशाखांच्या अधिष्ठातांचीही पदे तसेच ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक पदासाठी अर्ज करण्यासही मुदतवाढ देण्यात आली आहे.

शिक्षक पदाच्या ७३ जागांसाठी २६ फेब्रुवारी ते १२ मार्च या दरम्यान एकुण ६ हजार ८३१ अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करण्यात आले आहेत. तर अधिष्ठांताची चार पदे व ज्ञान स्त्रोत केंद्र संचालक अशा पाच पदासाठी एकूण ८० आवेदन आले आहेत. या सर्वांनी येत्या २५ मार्च सायंकाळी ६ वाजेपर्यंत एआरसी फॉर्मसह हार्ड कॉपी दाखल करणे आवश्यक आहे, असेही कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande