
अमरावती, 14 मार्च (हिं.स.)।
अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेत फिशरीज हब प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती, भविष्यातील कार्ययोजना, प्रकल्पाची व्यवहार्यता तसेच विविध प्रशासकीय बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीदरम्यान फिशरीज हब प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीसंदर्भात मासेमार संघटना, संस्था तसेच संबंधित व्यावसायिक यांच्या सहभागातून प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्रकल्पाचे संचालन, व्यवस्थापन व दीर्घकालीन उपयोगिता लक्षात घेता मासेमार संघटना, सहकारी संस्था तसेच व्यवसायिकांकडून प्रस्ताव मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित घटकांचा सहभाग वाढवून प्रकल्पाला अधिक चालना देण्याबाबत आयुक्तांनी निर्देश दिले. सर्व पाचही जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त मत्स्य विभागांना मत्स्य उत्पादनाबाबत तसेच कार्यक्षेत्रातील तलाव बाबत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.
फिशरीज हब प्रकल्पाशी संबंधित जिल्हानिहाय उत्पादन क्षमता, उपलब्ध संसाधने तसेच प्रकल्पाची उपयुक्तता याचा देखील बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. मत्स्य व्यवसायाच्या वाढत्या संधी लक्षात घेता प्रकल्पाचा प्रभावी वापर करून मासेमारांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली.
प्रकल्पाच्या संचालनासाठी शासन निर्णयानुसार O & M (ऑपरेशन अँड मेंटेनन्स) तसेच PPP (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) धोरण निश्चित करण्याबाबतही विचारमंथन करण्यात आले. प्रकल्पाचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम पद्धतीने होण्यासाठी शासनाच्या धोरणांचा आधार घेत पुढील कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.
फिशरीज हब प्रकल्पाच्या अंतर्गत विविध प्रक्रिया, साठवण, प्रक्रिया केंद्र, बाजार व्यवस्थापन इत्यादींसाठी दैनंदिन वापराकरिता सुमारे १ लाख ५० हजार लिटर प्रतिदिन पाण्याची आवश्यकता भासणार असल्याने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने आवश्यक त्या विभागांशी समन्वय साधून पाणी नियोजनाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सद्यस्थितीत बाजार परिसरात कार्यरत असलेल्या मासेमार संघटना, संस्था तसेच मच्छीमार यांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यावरही बैठकीत विशेष भर देण्यात आला. मासळी विक्री, साठवण आणि वाहतूक यासंदर्भातील व्यवस्था अधिक सुस्थितीत करण्यासाठी नियोजनात्मक उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान पशु शल्य चिकीत्सक तथा फिशरीज हब चे नोडल अधिकारी डॉ.सचिन बोंद्रे यांनी फिशरीज हब प्रकल्पाविषयी मार्गदर्शनपर प्रेझेंटेशन सादर केले. या सादरीकरणांमध्ये प्रकल्पाची कार्यपद्धती, संभाव्य सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच व्यवस्थापन पद्धती याविषयी माहिती देण्यात आली.
प्रकल्पाची व्यवहार्यता (Feasibility) तसेच आर्थिक पडताळणी (Financial Verification) करण्यासाठी महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळ (एमएफडीसी) व महानगरपालिका उपायुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सविस्तर अहवाल तयार करण्याबाबतही बैठकीत निर्णय घेण्यात आला. हा संयुक्त अहवाल तयार करून पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
उपायुक्त कार्यालयामार्फत प्राप्त पत्रानुसार विविध प्रशासकीय व तांत्रिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यात आले. प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून कार्यवाही करण्याबाबतही निर्देश देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी