
परभणी, 14 मार्च (हिं.स.)।
परभणी महानगरपालिकेच्या विविध समित्यांच्या सदस्यांच्या निवडीसाठी महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा यांच्या उपस्थितीत 18 मार्च रोजी येथील बी. रघुनाथ सभागृहात विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या या विशेष सर्वसाधारण सभेची विषयपत्रिका महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 20 (2) अन्वये जाहीर करण्यात आली आहे. या सभेमध्ये महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या एकूण 16 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. सुधारित कलम 31-अ नुसार महानगरपालिकेतील पक्ष किंवा गटांच्या संख्याबळाच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देऊन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 29-अ अन्वये प्रभाग समित्यांची रचना करण्याचा विषयही सभेत विचारार्थ ठेवण्यात आला आहे.
याशिवाय सर्वसाधारण सभा 4 ऑगस्ट 2012 च्या ठराव क्रमांक 8 अन्वये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 3 (2) नुसार गठीत करण्यात आलेल्या विशेष समितीच्या सदस्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्तावही मांडण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र महानगरपालिकेतील नामनिर्देशित सदस्यांच्या अर्हता व नियुक्त्यांबाबत 23 मार्च 2023 रोजीच्या राज्यपत्रातील अधिसूचनेनुसार परभणी शहर महानगरपालिकेच्या नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्यांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
या विशेष सर्वसाधारण सभेला महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा, उपमहापौर गणेश देशमुख यांच्यासह नगरसेवक व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis