देहर्जे (विक्रमगड) आणि विरार येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पालघर, 14 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१’ अंतर्गत आज ग्रामपंचायत कार्यालय, देहर्जे (ता. विक्रमगड) येथे महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आल
देहर्जे (विक्रमगड) आणि विरार येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान  शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


पालघर, 14 मार्च (हिं.स.)।

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१’ अंतर्गत आज ग्रामपंचायत कार्यालय, देहर्जे (ता. विक्रमगड) येथे महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार मयूर चव्हाण, ग्रामपंचायत सरपंच प्रसाद जाधव तसेच विविध तालुका विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या महसूल व इतर शासकीय सेवांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

शिबिरामध्ये नागरिकांना ७/१२ उतारे, ८-अ उतारे तसेच विविध दाखले यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय ७/१२ अद्यावत करणे, ई-मोजणी, पाणंद रस्त्यांबाबत कार्यवाही, अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क, अकृषिक सुधारणा मार्गदर्शन, पीएम किसान योजना, दुय्यम शिधापत्रिका वाटप, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, आरोग्य तपासणी, मोफत डिजिटल सातबारा आदी सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.

तसेच शिबिरात गर्भवती महिलांना ‘बेबी किट’चे वाटप, तसेच शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरचे प्रत्येकी एक वाटप करण्यात आले. शासनाच्या “Single Day Service Delivery” उपक्रमांतर्गत अनेक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, या अभियानांतर्गत आजच विरार येथेही छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून समाजातील विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेत आहेत. शासनाचा हा उपक्रम सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे .

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande