लातूर पोलीस शिपाई भरतीसाठी 15 मार्चला लेखी परीक्षा
लातूर, 14 मार्च (हिं.स.)। लातूर पोलीस दल आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती 2024–2025 प्रक्रियेअंतर्गत मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर भरती प्रक्रियेत पु
पोलीस भरती


लातूर, 14 मार्च (हिं.स.)।

लातूर पोलीस दल आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती 2024–2025 प्रक्रियेअंतर्गत मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर भरती प्रक्रियेत पुरुष 262 व महिला 66 असे एकूण 328 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक 15/03/2026 रोजी सकाळी 11.00 वाजता पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव, लातूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांची यादी दिनांक 27/02/2026 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संबंधित उमेदवारांनी आपले लेखी परीक्षेचे हॉलतिकीट हे policerecruitment2025.mahait.org या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्यावेत. जर कोणत्याही उमेदवारास हॉलतिकीट डाउनलोड करण्यात अडचण येत असेल, तर त्यांनी त्वरित महा आयटी हेल्पलाईन क्रमांक 022-61316418 वर संपर्क साधावा किंवा policerecruitment2025.support@mahait.org या ई-मेल आयडीवर संपर्क करून आवश्यक मार्गदर्शन घ्यावे.

लेखी परीक्षेस उपस्थित राहणाऱ्या सर्व उमेदवारांनी परीक्षेपूर्वी काही बाबींची विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. उमेदवारांनी परीक्षेला येताना मैदानी चाचणीवेळी देण्यात आलेले प्रवेशपत्र तसेच लेखी परीक्षेचे हॉलतिकीट सोबत आणणे बंधनकारक राहील. त्याचबरोबर उमेदवारांनी स्वतःचे वैध ओळखपत्र जसे की आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र इत्यादींपैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. याशिवाय दोन पासपोर्ट साईज छायाचित्र सोबत असणेही आवश्यक राहील.

परीक्षेच्या दिवशी उमेदवारांनी वेळेचे काटेकोर पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. सर्व उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्याच्या किमान दोन तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, जेणेकरून ओळख पडताळणी, बैठक व्यवस्था आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करता येतील. उमेदवारांची बैठक व्यवस्था त्यांच्या अर्जावरील बैठकीच्या क्रमांकानुसार करण्यात येणार आहे. लेखी परीक्षेसाठी आवश्यक असलेले बॉलपॉईंट पेन व पॅड परीक्षा केंद्रावरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने उमेदवारांनी अनावश्यक साहित्य सोबत आणू नये.

उमेदवारांनी मोबाईल फोन, डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मायक्रो कॅमेरा, कॅल्क्युलेटर, डिजिटल नोटपॅड, नोट्स, पुस्तके, इअरफोन, हिअरिंग डिव्हाईस, स्मार्ट वॉच, स्मार्ट आयग्लासेस, इलेक्ट्रॉनिक चिपयुक्त उपकरणे अथवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक साधने परीक्षा केंद्रात आणू नयेत. अशा वस्तू आढळल्यास संबंधित उमेदवाराविरुद्ध कठोर कारवाई केली जाऊ शकते.

भरती प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक, शिस्तबद्ध आणि गुणवत्ताधिष्ठित पद्धतीने पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाने सर्व पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना.

उमेदवारांनी काय करावे :

1)लेखी परीक्षेस येताना मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र व लेखी परीक्षेचे हॉलतिकीट सोबत आणावे.

2)आधारकार्ड / पॅनकार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक वैध ओळखपत्र आणावे.

3)दोन पासपोर्ट साईज छायाचित्र सोबत ठेवावे.

4)परीक्षा सुरू होण्याच्या किमान 2 तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.

उमेदवारांनी काय करू नये :

1)मोबाईल फोन, डिजिटल डायरी, कॅल्क्युलेटर, इअरफोन, स्मार्ट वॉच, स्मार्ट ग्लासेस किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक साधने सोबत आणू नयेत.

2)कोणत्याही प्रकारचे दागिने परिधान करून परीक्षा केंद्रात येऊ नये.

3)कोणताही अनुचित प्रकार, कॉपी, संकेत, इतरांना मदत किंवा नियमभंग करू नये.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande