
सोलापूर, 14 मार्च (हिं.स.)।
प्रसिद्ध न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा माने-मुसळेच्या दोषमुक्त अर्जावर 16 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. अर्ज दिल्यानंतर सहा महिन्यानंतर पहिली सुनावणी ठेवण्यात आली आहे.डॉ. शिरीष यांच्यासह सात जणांचे मोबाईल सीडीआर व टॉवर लोकेशन द्यावे, तसेच या खटल्यात संशयित आरोपी मनीषाला दोषमुक्त करावे, असा अर्ज मनीषाचे वकील ॲड. प्रशांत नवगिरे यांनी सप्टेंबर महिन्यात दिला होता. या अर्जापैकी सहा महिन्यांत मोबाईलचे सीडीआर आणि टॉवर लोकेशन देण्याबाबत तारखा झाल्या; परंतु दोषमुक्तीच्या अर्जावर एकही सुनावणी झाली नव्हती. सीडीआर आणि टॉवर लोकेशनबाबत सुनावणी होती. यावेळी दोन्हींच्या फाईलचे पासवर्ड सरकार पक्षाने मनीषाच्या वकिलांना दिले. त्यामुळे त्या अर्जाची सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर आता मनीषाच्या दोषमुक्ती अर्जावर जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी लगेच 16 मार्च रोजी सुनावणी ठेवली आहे. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, तर सरकारतर्फे ॲड. आनंद कुर्डुकर काम पाहत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड