मेळघाटातील अक्राळविक्राळ ‘भुताचे झाड’ का बदलते रंग? निसर्गाचा अद्भुत चमत्कार आणि स्थानिकांच्या आस्था!
अमरावती, 14 मार्च (हिं.स.) रंग बदलणारे सरडे आपण पाहिले आहेत. पण, एखादे झाड तीनदा रंग बदलू शकते, यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. निसर्गाची ही किमया मेळघाटातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये अनुभवायला मिळते. ‘भुताचे झाड’ (भुत्या) म्हणून ओळखले जाणारे हे वृक
मेळघाटातील अक्राळविक्राळ ‘भुताचे झाड’ का बदलते रंग? निसर्गाचा अद्भुत चमत्कार आणि स्थानिकांच्या आस्था!


अमरावती, 14 मार्च (हिं.स.)

रंग बदलणारे सरडे आपण पाहिले आहेत. पण, एखादे झाड तीनदा रंग बदलू शकते, यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. निसर्गाची ही किमया मेळघाटातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये अनुभवायला मिळते. ‘भुताचे झाड’ (भुत्या) म्हणून ओळखले जाणारे हे वृक्ष आपल्या अक्राळविक्राळ रुपामुळे आणि रात्रीच्या वेळी चमकणाऱ्या पांढऱ्या खोडामुळे पर्यटकांच्या कुतूहलाचा आणि स्थानिकांच्या श्रद्धेचा विषय ठरले आहेत.

मेळघाटात आढळणारा ‘घोस्ट ट्री’ (स्टेरक्युलिया युरेन्स) एक पानझडी वृक्ष आहे. आकर्षक फिकट रंगाची त्याची साल असते. हे झाड सहा महिन्यांपर्यंत निष्पर्ण राहते आणि पांढरे होते. या झाडाला, भुत्या, करू, पांढरून, कावळी, सरडोल अशा विविध नावांनी ओळखले जाते. मेळघाटातील आदिवासी बांधव या झाडाला भुत्या किंवा कढई असे संबोधतात. रात्रीच्या अंधारात हे झाड चमकत असल्यामुळे भीतीदायक दिसते. भयावह दृश्य पाहून पुर्वीच्या काळी लोकांना तिथे भूत असल्याचा भास व्हायचा, त्यामुळे या झाडाला ‘भुत्या’ असे नाव पडले असल्याचे हरीसाल येथील पर्यटक मार्गदर्शक अशोक आठवले यांनी सांगितले.

निसर्गाच्या या ‘कॅनव्हास’वर ‘भुत्या’ आपले रंग ऋतुमानानुसार बदलत असतो. उन्हाळ्यात मार्च महिन्यात पानगळ झाल्यावर हे झाड पांढरे दिसते. पावसाळा सुरू होताच हे झाड गर्द हिरवा शालू पांघरते. हिवाळ्यातील गुलाबी थंडीत या झाडाची त्वचाही गुलाबी छटा धारण करते.

उन्हाळ्यात जेव्हा जंगलात अन्नाची कमतरता असते, तेव्हा या झाडाच्या बिया पक्ष्यांची भूक भागवतात. या झाडाच्या फुलांना सूक्ष्म काटे असल्याने मानवी त्वचेला खाज सुटते. मात्र पक्ष्यांसाठी हे हक्काचे अन्नछत्र आहे. मेळघाटातील आदिवासी बांधव या वृक्षाला पवित्र मानतात. या झाडाला कधीही पाय लावला जात नाही किंवा त्यावर कुणी चढत नाही. याच्या डिंकाचा वापर औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो.

या झाडाची साल गुळगुळीत, पांढरी-पिवळी असते जी गळते, ज्यामुळे खालचा थर फिकट दिसतो. हे कोरड्या, खडकाळ आणि उष्ण प्रदेशात, बहुतेकदा डोंगराळ भागात वाढते. हे अत्यंत दुष्काळ सहनशील आहे, सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ पाण्याशिवाय जगण्यासाठी त्याची पाने गळतात. त्यामुळे झाडाची साल चंद्रप्रकाश परावर्तित करते. हे झाड अधिवास पुनर्संचयित करण्यास मदत करते आणि मातीची धूप रोखते. डिसेंबर ते मार्च दरम्यान या वृक्षाला पिवळ्या रंगाची फुले येतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande