
लातूर, 14 मार्च (हिं.स.)।
अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे गुरुवारी दुपारी थरारक घटना घडली. चिखली येथील रोहित महादेव दहिफळे (वय २३) या तरुणाला फोन करून बोलावून घेत, राजस्थान स्विट होमसमोर सहा जणांच्या टोळीने लोखंडी चाकूने सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात रोहित गंभीर जखमी झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), १८९, १८९(२), १८९(३), १८९(४), १९१(३), ३५२ आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी चक्रे फिरवली आहेत.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित दहिफळे हा शिक्षण घेत असून तो चिखली येथील रहिवासी आहे. आरोपींनी त्याला फोन करून किनगाव येथील राजस्थान स्विट होमसमोर बोलावून घेतले. रोहित तिथे पोहोचताच पूर्व नियोजित कट रचून बसलेल्या सहा जणांच्या बेकायदेशीर टोळीने त्याला घेरले.
काही कळायच्या आतच आरोपींनी रोहितच्या डाव्या बरगडीजवळ, उजव्या गुडघ्यावर, कोपरावर आणि हाताच्या बोटांवर चाकूने सपासप वार केले. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेला गावातीलच मुकेश चाटे यालाही आरोपी क्र. ३ याने दाबून धरले व फिर्यादीस ठार मारण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणातील आरोपी क्र. ६ लिंबाजी उर्फ विश्वजीत मुरकुटे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वीही किनगाव पोलीस ठाण्यात गुरन २७१/२५ कलम ११८(१), ११५, ३५२, ३५१(२), ३(५) BNS नुसार गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या दोन महिन्यांपूर्वी (०१/०१/२०२६ रोजी) त्याच्याकडून बीएनएसएस (BNSS) कलम १२६ अन्वये २५,००० रुपयांचा 'इंटेरिअम बाँड' (Interim Bond) लिहून घेण्यात आला होता. जामिनावर असतानाही त्याने पुन्हा हे धाडस केल्याने पोलिसांनी आता कठोर पावले उचलली जात आहेत.
१. ओमकार सोनवणे, २. गोकुळ गीत्ते (दोघे रा. सोनवणेवाडी), ३. प्रथमेश आचार्य उर्फ सोन्या (रा. कोपरा), ४. अनंत यशवंत हांगे (रा. हांगेवाडी), ५. ऋषीकेश घुले (रा. मोळवण, सध्या किनगाव), ६. लिंबाजी उर्फ विश्वजीत मुरकुटे (रा. पिसेवाडी सध्या- शेलमोहा, गंगाखेड). यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), १८९, १८९(२), १८९(३), १८९(४), १९१(३), ३५२ आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला
पोलिस प्रशासनाची तत्परता; एक जेरबंद
घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, प्रो. पोउपनि सत्यजित तोंडारे आणि सफौ टी. व्ही. वल्लमपले यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत एका आरोपीला तातडीने अटक केली आहे.
आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशानेच हा हल्ला केला होता. सध्या एक आरोपी अटकेत असून इतर फरार आरोपींच्या शोधासाठी दोन विशेष पथके रवाना झाली आहेत. सखोल तपास सुरू असून लवकरच सर्व आरोपी गजाआड होतील.
— माणिक डोके (सपोनि, पोलीस ठाणे किनगाव)
या प्रकरणाचा तपास स्वतः सपोनि माणिक डोके हे करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली असून, भरबाजारात झालेल्या या हल्ल्यामुळे पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis