
- दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव
पालघर, 14 मार्च (हिं.स.)।
आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड निर्माण व्हावी तसेच अंतराळ विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत मोखाडा तालुक्यातील सहा विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली आहे. १५ मार्च दरम्यान या भेटीचे आयोजन करण्यात आले असून यामुळे विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाची प्रत्यक्ष ओळख होणार आहे.
मोखाडा तालुका हा आदिवासी व अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या वैज्ञानिक संस्थांची प्रत्यक्ष माहिती मिळण्याची संधी फार कमी मिळते. ही बाब लक्षात घेऊन शिक्षण विभागाने गुणवंत व जिज्ञासू विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना इस्रो भेटीची संधी उपलब्ध करून दिली आहे.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना उपग्रह प्रक्षेपण प्रक्रिया, अंतराळ संशोधनातील आधुनिक तंत्रज्ञान, विविध वैज्ञानिक प्रयोग तसेच इस्रोच्या संशोधन कार्याची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राबद्दल उत्सुकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या उपक्रमामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. भविष्यात अशा प्रकारचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा मानसही विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, मोखाडा तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमधील स्वरा पालवे, साईनाथ वाजे, ध्रुव घाटाळ, यश जाधव, शालिनी गिरे व निशा खडके या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांच्यासोबत प्राथमिक शिक्षक युवराज महाले मार्गदर्शक म्हणून सहभागी झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL