
रत्नागिरी, 14 मार्च, (हिं. स.) : आंबा उत्पादन दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे शासनाने केवळ घोषणा न करता बागायतदारांचे सोडवावेत, अशी मागणी आंबा व्यावसायिक व संघटनेचे पदाधिकारी डॉ. विवेक भिडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली.
यावेळी प्रकाश साळवी, तुकाराम घवाळी, राजन कदम, संजय हर्षे यांच्यासह बागायतदार उपस्थित होते. डॉ. भिडे यांनी सांगितले की, यावर्षी हवामानातील बदलामुळे आंबा आवक घटल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. सद्यःस्थितीला आंबा पेटीला सहा ते दहा हजार रुपये विक्रमी दर मिळत आहे. कोकणातून केवळ ४०० ते ५०० पेट्यांची आवक होत आहे. आंबा पिकासाठी बागायतदारांनी घेतलेले कर्ज साधारण ६० कोटींच्या घरात आहे. पीकच हाती नसल्याने हे कर्ज फेडणे अशक्य झाले आहे. त्यामुळे सरकारने यावर्षीच्या आंबा पीक कर्जफेडीसाठी आर्थिक मदत करावी. पीक विमा योजनेचे निकषही बदलणे गरजेचे आहे. हे निकष बागायतदारांना विश्वासात घेऊन तयार केले पाहिजेत, जेणेकरून बागायदारांचे नुकसान होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
हवामानातील सातत्यपूर्ण बदलामुळे यावर्षी अवघे २० टक्केच आंबा उत्पादन असल्याचा अहवाल कृषी विभाग व कृषी विद्यापीठाने दिला आहे. शिवाय आखाती प्रदेशातील युद्धाचा परिणाम आंबा निर्यातीवर झाला आहे. त्यामुळे बागायतदारांना सरकारकडून अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी