
सोलापूर, 14 मार्च, (हिं.स.)। रेल्वे क्रमांक 11411 व 11412 परळी सांगली डेमो एक्सप्रेस रेल्वेस जवळा स्टेशनवर थांबा मिळावा, अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.सांगली मधून परळीकडे जाण्याकरीता रात्रीची शेवटची ही ट्रेन आहे. सद्य परिस्थितीत प्रवाशांना एकतर जत रोड किंवा सांगोला येथे उतरून परत उलट दिशेने खाजगी वाहनाने रात्री अपरात्री प्रवास करावा लागतो.
सदरच्या उलट प्रवासामुळे या परिसरातील प्रवासी त्रस्त आहेत. सर्वसामान्य लोक जे हॉस्पिटलसाठी रोज ये जा करतात. त्यांची येण्याची व जाण्याची सोय थांब्यामुळे होणार आहे. जवळा स्टेशनला अधिकृत थांबा दिल्यानंतर मानेगाव, निजामपूर, डोंगरगाव, सोनंद, जवळा, बुरंगेवाडी, भोपसेवाडी, आगलावेवाडी, तरंगेवाडी, हून्नूर, भोसे, घेरडी या सर्व मोठ्या गावातील लोकांची दररोज सोय होणार आहे. रेल्वेचेही पर्यायाने उत्पन्न वाढणार आहे. दवाखाना आणि दैनंदिन कामासाठी रोज प्रवाशांना जाण्यासाठी हा थांबा गरजेचा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड