
अमरावती, 15 मार्च (हिं.स.)।
अंजनगावसुर्जी नगरपरिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता कर वसुलीस प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने ५० टक्के शास्ती माफीसह अभय योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे. ही योजना २० मार्चपर्यंत राबविण्यात येणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्ती अंशतः किंवा पूर्णतः माफ करून कर वसुली वाढविण्यासाठी अभय योजना राबविण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार नगरपरिषदेकडून जिल्हाधिकारी कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. नगरपरिषद क्षेत्रातील मालमत्ता कराची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मालमत्ता कराची एकत्रित थकबाकी सुमारे चार कोटी ७७ लाख ५७ हजार १३१ रुपये इतकी आहे. त्यामधील शास्तीची रक्कम मोठी असल्याने कर वसुलीवर विपरीत परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आदेश काढत १९ मे २०२५ पर्यंतच्या थकीत मालमत्ता करावरील शास्तीपैकी ५० टक्के शास्ती माफ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे थकबाकीदारांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या कालावधीत थकीत व कराची एकूण ७० टक्के वसुली झाल्यास अभय योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी