
रत्नागिरी, 15 मार्च, (हिं. स.) : चिपळूण शहराच्या पूरमुक्तीला चालना मिळावी यासाठी वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा मोहीम यंदाही जलसंपदा विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. बाजारपूल येथील गणेश विसर्जन घाट, गोवळकोट आणि पेठमाप परिसरात सध्या गाळ उपशाचे काम सुरू असून आतापर्यंत सुमारे ८० हजार घनमीटर गाळ काढण्यात आला असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.
चिपळूण शहर आणि परिसरात २०२१ साली आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तेचे नुकसान झाले होते. त्यानंतर वाशिष्ठी व शिवदी नद्यांतील गाळाचा प्रश्न ऐरणीवर आला. गाळउपशाला गती देण्यासाठी नागरिकांच्या सहभागातून चिपळूण बचाव समितीने आंदोलनही केले होते. त्यानंतर पहिल्या वर्षी मोठ्या प्रमाणात यंत्रणा लावून गाळ उपशाचे काम करण्यात आले होते.
सध्या यांत्रिकी विभागाकडून ५ पोकलेन आणि ११ डंपर यांच्या साह्याने गाळ काढण्याचे काम सुरू आहे. शहरातील बाजारपूल येथील गणेश विसर्जन घाट, गोवळकोट आणि पेठमाप या भागात गाळ उपसा करण्यात येत आहे. काढलेला बहुतांश गाळ महसूल विभागाकडे रॉयल्टी भरलेल्या खासगी जागांमध्ये टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने गाळ काढला जात असल्यामुळे गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही शहरात पूरस्थिती निर्माण झाली नव्हती. तसेच नलावडा बंधारा उभारण्यात आल्याने शहरात पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
पावसाळा सुरू होईपर्यंत गाळउपसा मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती देताना जलसंपदा विभागाचे उपअभियंता विपुल खोत यांनी सांगितले की, आतापर्यंत वाशिष्ठी नदीतून सुमारे ८० हजार घनमीटर गाळ काढण्यात आला असून सध्या गणेश विसर्जन घाट, गोवळकोट आणि पेठमाप येथे काम सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी