नाशिकमध्ये पहिल्यांदाच ‘एएससीओ डायरेक्ट जीआय कॅन्सर्स’चे यशस्वी आयोजन
‘ASCO Direct GI Cancers’ successfully organized for the first time in Nashik
ASCO Direct GI Cancers’ successfully


नाशिक, 15 मार्च (हिं.स.)।: नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरतर्फे पहिल्यांदाच ‘एएससीओ डायरेक्ट जीआय कॅन्सर्स सिम्पोजियम’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. शनिवार (१४ मार्च) आणि रविवार (१५ मार्च) रोजी झालेल्या या कार्यक्रमात देश-विदेशातील कर्करोग तज्ज्ञांनी सहभाग नोंदवला. या सिम्पोजियममध्ये एचसीजी हॉस्पिटलमध्ये तीन रोबोटिक शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच कर्करोग उपचारांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे जागतिक स्तरावरील ३५ शोधनिबंध मांडण्यात आले, अशी माहिती एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक तथा शल्य कर्करोगतज्ज्ञ आणि रोबोटिक सेवांचे प्रमुख प्रा. डॉ. राज नगरकर यांनी दिली. ग्लोबल हेल्थकेअर अकॅडमीच्या सहकार्याने आयोजित या परिषदेत सुमारे १५० ते २०० प्रतिनिधी आणि ४० ते ५० ख्यातनाम वक्ते सहभागी झाले होते. शंभराहून अधिक दुर्बिणीद्वारे (लॅपरोस्कोपिक) आणि रोबोटिक शस्त्रक्रिया करणारे शल्यचिकित्सक, तसेच शंभरपेक्षा अधिक वैद्यकीय कर्करोगतज्ज्ञ उपस्थित होते. या सिम्पोजियमचे मुख्य आकर्षण सिम्युलेशनवर आधारित रोबोटिक प्रशिक्षण होते. इंट्युटिव्ह, सीएमआर सर्जिकल आणि एज रोबोटिक सिस्टिम्स या कंपन्यांच्या प्रगत रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणालीद्वारे तज्ज्ञांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. सुमारे ५० निवडक शल्यचिकित्सकांनी या विशेष प्रशिक्षणात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे नेतृत्व डॉ. राज नगरकर यांनी केले. यावेळी डॉ. विजय कुमार, डॉ. श्याम मोहन, डॉ. गोपीनाथ के.एस., डॉ. शिशिर शेट्टी, डॉ. गोविंद बाबू, डॉ. सचिन त्रिवेदी, डॉ. शैलेश व्ही. श्रीखंडे, डॉ. जगन्नाथ दीक्षित आणि डॉ. जगदीश कोठारी या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

भारत हा जगातील सहावा देश ठरला एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राज नगरकर म्हणाले की, नाशिकमध्ये ‘एएससीओ डायरेक्ट जीआय कॅन्सर्स सिम्पोजियम’ आयोजित करणे ही भारत आणि आमच्या संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. या प्रतिष्ठित शैक्षणिक कार्यक्रमाचे यजमानपद भूषवणारा भारत हा जगातील सहावा देश ठरला आहे..या कार्यक्रमामुळे भारतीय डॉक्टरांना जागतिक स्तरावरील सर्वोत्तम उपचारपद्धती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.” ---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande