अहमदपुरात हॉटेल व्यावसायिकांवर प्रशासनाची धाड; ५ घरगुती गॅस सिलेंडर जप्त
लातूर, 15 मार्च (हिं.स.) अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यांमुळे जागतिक स्तरावर युद्धाचा भडका उडाला असून इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या युद्धाचे पडसाद आता स्थानिक स्तरावर उमटू लागले असून, घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्
अहमदपूर


लातूर, 15 मार्च (हिं.स.) अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यांमुळे जागतिक स्तरावर युद्धाचा भडका उडाला असून इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या युद्धाचे पडसाद आता स्थानिक स्तरावर उमटू लागले असून, घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होईल या भीतीने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदपूर प्रशासनाने कडक पावले उचलली असून, हॉटेलमध्ये घरगुती सिलेंडरचा अवैध वापर करणाऱ्यांवर धाड टाकून ५ सिलेंडर जप्त केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण या युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. इंधन तुटवडा होणार असल्याच्या केवळ अफवेनेच नागरिक धास्तावले असून, गॅस नोंदणीसाठी अहमदपूरमधील गॅस एजन्सी आणि संकेतस्थळांवर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. परिणामी सर्व्हरवर ताण आल्याने नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत आहेत. या गोंधळाचा गैरफायदा घेऊन काही हॉटेल व्यावसायिक घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक कामांसाठी करत असल्याचे समोर आले आहे.

प्रशासनाकडून हॉटेलची झाडझडती

.........................,.......................

घरगुती ग्राहकांना गॅस मिळण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून जिल्हा पुरवठा विभाग सतर्क झाला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड आणि पुरवठा निरीक्षण अधिकारी शुभांगी जवादे यांनी शहरात अचानक तपासणी मोहीम राबवली. यावेळी शहरातील दोन नामांकित हॉटेल्समध्ये घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर होत असताना आढळून आला. प्रशासनाने तात्काळ कारवाई करत तेथील ५ सिलेंडर जप्त केले आहेत. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून नियम मोडणाऱ्यांना प्रशासनाने दणका दिला आहे.

नागरिकांनी घाबरू नये; पुरवठा सुरळीत राहील: - तहसीलदार

.....................................

जागतिक परिस्थितीमुळे इंधन बाजारात काही हालचाली असल्या तरी, शहरात सध्या घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडून सिलेंडरचा अनावश्यक साठा करू नये. ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन्स आहेत, त्यांनी सध्या एकाच सिलेंडरची नोंदणी करावी. घरगुती ग्राहक, अनुदानित वसतिगृहे आणि रुग्णालयांना प्राधान्याने पुरवठा केला जाईल.

— उज्वला पांगरकर, तहसीलदार, अहमदपूर.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande