
अकोला, 15 मार्च, (हिं.स.) अकोल्याच्या बाळापुर तालुक्यातील सोनाळा गावात घराच्या छतावरून गेलेल्या महावितरणाच्या विद्युत तारेमुळे गंभीर अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. अनेक वर्षे तक्रारी करूनही संबंधित विभागाने दखल न घेतल्याने अखेर घराच्या छतावर काम करणाऱ्या जाकीर खान नामक व्यक्तीचा विजेच्या धक्क्याने जीव धोक्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
माहितीनुसार, संबंधित घराच्या छतावरून महावितरणाची अलंकी (विद्युत) तार गेली असून ती हटवण्याबाबत घरमालक बाळकृष्ण कुरवाडे, रमेश अमझरे यासह आठ ते दहा घरांवरील व परिसरातील नागरिकांनी मागील 20 ते 25 वर्षांपासून वारंवार विद्युत विभागाकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या. मात्र, याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या त्या घराचे बांधकाम सुरू असल्याने एक कामगार छतावर काम करत असताना अचानक त्या विद्युत तारेमुळे त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. शॉर्टसर्किटमुळे त्याचे शरीर गंभीररीत्या भाजले असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सुदैवाने त्याचा जीव वाचला असला तरी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
अपघातानंतर महावितरणचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्यासाठी आले. मात्र, नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “वारंवार तक्रारी करूनही विद्युत तारा हटवण्यात आल्या नाहीत. जर वेळेत कारवाई केली असती तर हा गंभीर अपघात टाळता आला असता.” या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी महावितरणच्या निष्काळजी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या या प्रकाराबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि घरांवरून गेलेल्या धोकादायक विद्युत तारा तात्काळ हटवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे