
रत्नागिरी, 15 मार्च, (हिं. स.) : राष्ट्र सेविका समिती आणि रत्नागिरी रत्नकोंदणतर्फे महिला दिनानिमित्ताने महिलांसाठी लेख, कविता आणि चित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
जे खळांची व्यंकटी सांडो.. या पसायदानातील वाक्याला धरून तसेच दाता दुर्लभो भूवि: असाही एक विषय आहे. त्याअनुषंगाने काही वेगवेगळे विषय तयार केले आहेत. वाईट गोष्टी घालवायच्या तर चांगल्याची भर करणे जरुरी असते. हे सर्व क्षेत्रात गरजेचे तसे लागू पडते. त्यादृष्टीने स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
लेख स्पर्धेची शब्दमर्यादा ५०० ते ७५० शब्द असून मर्यादा ओलांडल्यास लेख स्पर्धेतून बाद होईल. व्याकरण तसेच शुद्धलेखनसुद्धा निकाल देताना बघितले जाईल. जो विषय निवडाल त्यावर लिहिताना लेख किंवा कवितेला स्वतंत्र शीर्षक असावे. कविता कमीत कमी १६ ओळी आणि जास्तीत जास्त २४ ओळींची असावी. तसेच वरील दोनपैकी एका विषयाला धरून असावी. चित्र स्पर्धेतील चित्र विषयाला धरून असावे. ए फोर आकाराच्या ड्रॉईंग पेपरवर ते चित्रित केलेले असावे.
स्पर्धेसाठी खालील मुद्द्यांचा विचार करावा. नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे, आध्यात्मिक श्रेत्रात प्रयत्न करण्यासाठी उपयुक्तता, राष्ट्रासाठी याची उपयुक्तता, कुटुंबासाठी उपयुक्तता, धर्मासाठी उपयुक्तता, सत्प्रवृतीत वाढ कशी करता येईल?, आधी केले मग सांगितले, समाजासाठी उपयुक्तता, जे जे भेटे भूत.. ते ते जाणिजे भगवंत, उत्तमाते धरिजे अधम तरी अव्हेरिजे, दाता दुर्लभो भूवि; रक्तदान, अवयवदान, समयदान, संस्कार दान, वित्त दान, अक्षरदान, पसायदान, सकारात्मकता यावी म्हणून मी काय करू शकतो, मनावर नियंत्रण, वाल्याचा वाल्मीकी, केवळ सत्पात्री दान, दानाने दुबळे करू नका, विश्वकल्याणासाठी उपयुक्तता, देहदान.
आपले लेख, कविता चित्र १० एप्रिलपर्यंत हाती किंवा टपालाने सुनेत्रा विजय जोशी, मीत बंगला, सन्मित्रनगर, लिमये गार्डनजवळ, रत्नागिरी ४१५६१२ (संपर्क क्रमांक - ९८६००४९८२६) या पत्त्यावर पाठवावेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी