
नांदेड, 15 मार्च (हिं.स.)।
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य पदासाठी तब्बल दीडशेहून अधिक इच्छुकांनी भाजपाकडे मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. या इच्छुकांपैकी दहा जणांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर अंतिम पाच जणांची नावे बंद लखोट्यात देत भाजपचे गटनेते अॅड. महेश कनकदंडे यांनी ती आयुक्तांकडे सुपूर्द केली आहेत.
या पाच नावांबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. समाजमाध्यमांवर विविध नावे पुढे येत असून त्यामध्ये भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी अॅड. दिलीप ठाकूर यांचेनाव अग्रक्रमाने चर्चेत आहे. याशिवाय अन्य काही नावेही चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. चैतन्यबापू देशमुख यांचे नावही या संदर्भात समोर आले.
स्वीकृत सदस्यांसाठी पाठविण्यात आलेल्या नावांबाबत पक्षपातळीवर गोपनीयता पाळली जात असल्याचे दिसून येते.
याबाबत भाजपचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर म्हणाले की, सर्व इच्छुकांची नावे प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात आली होती.
भाजपकडून स्वीकृत सदस्य म्हणून कोणाची निवड होणार, याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.
येत्या १६ तारखेला होणाऱ्या महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्वीकृत सदस्य म्हणून भाजपाकडून कोणत्या निष्ठावंतास संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis