
नांदेड, 15 मार्च (हिं.स.)
भोकर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या कर वसुलीसाठी भोकर नगर परिषदेने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि 'धडक मोहीम' हाती घेतली आहे. मुख्याधिकारी ऋषभ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या सर्वच विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह ही कारवाई सुरू असून, प्रशासनाने कर वसुलीसाठी पावले उचलली आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार सूचना देऊनही कर भरण्याबाबत टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध नगर परिषद प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे. या धडक मोहिमेअंतर्गत आजपर्यंत शहरातील विविध भागांतील एकूण २७नळ कनेक्शन जागीच कापण्यात आले आहेत. पाणीपट्टी थकवणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संकेत या कारवाईतून देण्यात आला आहे.
नळ कनेक्शन कापण्यासोबतच मालमत्ता कर थकवणाऱ्या एकूण ३० जणांना प्रशासनाच्या वतीने कडक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या थकबाकीदारांना कर भरण्यासाठी केवळ ३ दिवसांची मुदत देण्यात आली असून, या मुदतीत कराचा भरणा न केल्यास थेट मालमत्ता सील करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यामुळे शहरातील मोठ्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. पंप ऑपरेटर व वॉल्व्हमनची टीम प्रत्यक्ष मैदानात उतरून नळ कनेक्शन तोडण्याचे काम करत आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis