
बीड, 15 मार्च (हिं.स.)महसूल मंडळ राजुरी (न) अंतर्गत मौजे तळेगाव, ता. जि. बीड येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान” उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरामध्ये महसूल तसेच इतर विविध शासकीय विभागांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचे तात्काळ निवारण करण्यासाठी विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या.
या शिबिरास विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर श्री. जितेंद्र पापळकर साहेब, जिल्हाधिकारी बीड श्री. विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जितीन रहमान तसेच अपर जिल्हाधिकारी श्री. हरिष धार्मिक यांची मान्यवर उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शिबिरास अधिक परिणामकारक स्वरूप प्राप्त झाले.
शिबिरामध्ये नागरिकांना सातबारा उताऱ्यावरील दुरुस्ती, डिजिटल सातबारा वाटप, प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, जमिनीविषयक तक्रारींचे निराकरण, ई-पीक पाहणी, विविध प्रमाणपत्रांचे वाटप तसेच कृषी, पंचायत, आरोग्य, जलसंपदा इत्यादी विभागांच्या योजनांची माहिती व लाभ देण्यात आले.
या अभियानामुळे शासनाच्या सेवा गावपातळीवर, जलद व सुलभ पद्धतीने उपलब्ध होऊन नागरिकांच्या अडचणी दूर करण्यास मोठी मदत झाली. शासन प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्यासाठी हे अभियान निश्चितच उपयुक्त ठरत आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis