
बीड, 15 मार्च (हिं.स.)लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांची आमदार सुरेश धस यांनी सामाजिक न्याय भवन, पुणे येथे भेट घेतली. त्यांनी नुकताच महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला
सन २०२२ मध्ये राज्य शासनाने ऊसतोडणी कामगारांसाठी या महामंडळाची घोषणा करून ते कार्यान्वित केले आहे. या महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोडणी कामगारांची नोंदणी करून ओळखपत्र देणे, कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा व वसतिगृह उपलब्ध करून देणे, अपघाती विमा योजना, गळीत हंगामात ऊसतोडणी कामगारांच्या बैलांचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदान देणे, तसेच महिला कामगारांसाठी आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी आमदार धस यांनी मागणी केली.
गर्भधारणेच्या कालावधीत महिला कामगारांना सकस आहार, तसेच गळीत हंगामाच्या काळात सेंट्रलाइज किचनच्या माध्यमातून मजुरांना सकाळी जेवणाचा डबा (बांधकाम कामगारांच्या धर्तीवर) देण्यासारख्या योजना राबविण्याची गरजही यावेळी व्यक्त केली. त्यामुळे कामगारांचे आरोग्य सुधारण्यास आणि त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा मिळण्यास मदत होईल.
मागील दोन ते तीन वर्षांत बीड जिल्ह्यातील अनेक ऊसतोडणी कामगार इतर जिल्ह्यांमध्ये गळीत हंगामासाठी गेले असताना त्यांच्या बैलांचे अपघाती मृत्यू व अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र संबंधित कामगारांना अद्याप विमा व सानुग्रह अनुदान मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच कारखाना परिसरात किंवा कामाच्या ठिकाणी मृत्यू झालेल्या ५० हून अधिक कामगारांच्या कुटुंबीयांनाही अद्याप आर्थिक मदत मिळालेली नसल्याबाबत चर्चा करून त्या कुटुंबांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली.
याशिवाय या कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून मागील दोन ते तीन वर्षांत वसतिगृह बांधकाम, मध्यवर्ती कार्यालय, विभागीय कार्यालयांची दुरुस्ती, पाणी फिल्टर, ओळखपत्र वितरण, “आनंदाचा शिधा” वाटप आदी विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या आहेत. या कामांची सद्यस्थिती काय आहे, ती प्रत्यक्षात कार्यान्वित झाली आहेत का ? याबाबत विचारणा केली.
या सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा करून श्रीमती मुंडे यांनी पुढील काळात ऊसतोडणी कामगारांसाठी पथदर्शी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis