फळविक्रेत्याचा 'माफीनामा'; नालीत पडलेली फळे विक्रीला ठेवल्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल
लातूर, 15 मार्च (हिं.स.)। उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात नालीत पडलेली फळे पुन्हा विक्रीसाठी काढतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकारानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती
माफीनामा


लातूर, 15 मार्च (हिं.स.)।

उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात नालीत पडलेली फळे पुन्हा विक्रीसाठी काढतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकारानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. मात्र, आता या प्रकरणातील संबंधित फळविक्रेत्याचा शोध लागला असून त्याने जाहीररीत्या उदगीरकरांची माफी मागितली आहे.

काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात एका फळविक्रेत्याची काही खरबुजे नालीत पडली होती. ती फेकून देण्याऐवजी त्या विक्रेत्याने ती सांडपाण्यातून बाहेर काढून, वरवर धुवून पुन्हा ग्राहकांना विकण्यासाठी स्टॉलवर ठेवली होती. एका सजग नागरिकाने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केल्यामुळे हा संतापजनक व्हिडिओ समोर आला होता.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उदगीरकरांनी संबंधित विक्रेत्यावर कारवाईची मागणी केली होती. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते यांनी तात्काळ शोधमोहीम राबवून त्या फळविक्रेत्याला गाठले. लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेजबाबदार कृत्याबद्दल त्याला जाब विचारण्यात आला.

केली चुकीची कबुली

सामाजिक कार्यकर्त्यांच्या दणक्यानंतर संबंधित फळविक्रेत्याचा चेहरा आणि नाव समोर आले आहे. झालेल्या प्रकाराबद्दल त्याने आपली चूक मान्य केली असून, पुन्हा असे कृत्य करणार नाही, असे सांगत उदगीरकरांची जाहीर माफी मागितली आहे.

जरी विक्रेत्याने माफी मागितली असली, तरी अशा प्रकारांमुळे शहरात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन आणि अन्न व औषध विभागाने बाजारपेठेतील स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

'

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande