गॅसटंचाईचा आयटी क्षेत्रावर परिणाम, कॅन्टीन सेवा प्रभावित
नांदेड, 15 मार्च (हिं.स.)देशभरात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस टंचाईचा परिणाम आता आयटी उद्योगावरही दिसू लागला आहे. गॅस पुरवठा मर्यादित झाल्यामुळे काही प्रमुख आयटी कंपन्यांनी त्यांच्या कॅम्पसमधील कॅन्टीन सेवा मर्यादित केल्या असून काही ठिकाणी कर्मचाऱ्य
गॅसटंचाईचा आयटी क्षेत्रावर परिणाम, कॅन्टीन सेवा प्रभावित


नांदेड, 15 मार्च (हिं.स.)देशभरात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस टंचाईचा परिणाम आता आयटी उद्योगावरही दिसू लागला आहे. गॅस पुरवठा मर्यादित झाल्यामुळे काही प्रमुख आयटी कंपन्यांनी त्यांच्या कॅम्पसमधील कॅन्टीन सेवा मर्यादित केल्या असून काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चा पर्यायही देण्यात आला आहे. या परिस्थितीचा परिणाम पुणे, बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादसारख्या प्रमुख आयटी केंद्रांवर होत असून तेथे कार्यरत असलेल्या नांदेडसह मराठवाड्यातील अनेक अभियंत्यांनाही याचा अप्रत्यक्ष फटका बसत आहे. भारताची प्रमुख आयटी कंपनी इन्फोसिसने पुणे, बंगळुरू आणि चेन्नई येथील आपल्या

कॅम्पसमधील फूड कोर्टमध्ये मेनू मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या ई-मेलनुसार एलपीजी पुरवठा कमी झाल्यामुळे कॅन्टीनमध्ये स्वयंपाक करणे कठीण झाले आहे. त्यामुळे जास्त गॅस लागणारे डोसा, ऑम्लेट यांसारखे पदार्थ मेनूमधून तात्पुरते वगळण्यात आले आहेत.

परिस्थिती सामान्य होईपर्यंत 'लाईव्ह काउंटर' बंद ठेवण्यात आले असून मर्यादित खाद्यपदार्थच उपलब्ध करून दिले जात आहेत. इन्फोसिसच्या बेंगळुरू कॅम्पसमध्ये दररोज सुमारे २० हजार कर्मचारी येतात, तर पुणे आणि चेन्नईसह एकूण ४० ते ४५ हजार कर्मचाऱ्यांवर या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. एलपीजीचा पुरवठा कमी झाल्यामुळे काही ठिकाणी तयार अन्न बाहेरील स्वयंपाकघरांमधून मागवून देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच शक्य असल्यास कर्मचाऱ्यांनी घरून डबा आणावा, अशी सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, चेन्नई येथील एचसीएल टेकच्या कॅम्पसमध्ये कमर्शियल गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने कॅन्टीन चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांना दोन दिवस 'वर्क फ्रॉम होम' करण्याची मुभा दिली आहे. हा निर्णय सध्या केवळ चेन्नई कार्यालयापुरता मर्यादित असला तरी परिस्थिती कायम राहिल्यास इतर कंपन्यांनाही अशाच उपाययोजना कराव्या लागू शकतात.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande