अमरावतीत कोणार्कच्या कचरा वाहनांवर आरटीओची कारवाई; जागोजागी कचर्याचे ढिग
अमरावती, 15 मार्च (हिं.स.) महापालिका क्षेत्रातील कचरा वहनासाठी कोणार्क इन्फ्रा कंपनीने लावलेल्या वाहनांना नंबरप्लेट नसल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने या वाहनांची चाके थांबली आहेत. अकरा वाहने जागेवर उभी झाल्याने शहरातील कच
कोणार्कची कचरा वहनाची चाके थांबली आरटीओचा कारवाईचा बडगा; ढिगारे पडून, अकरा वाहने उभी


अमरावती, 15 मार्च (हिं.स.)

महापालिका क्षेत्रातील कचरा वहनासाठी कोणार्क इन्फ्रा कंपनीने लावलेल्या वाहनांना नंबरप्लेट नसल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने या वाहनांची चाके थांबली आहेत. अकरा वाहने जागेवर उभी झाल्याने शहरातील कचरा उचलण्यात अडचणी निर्माण होऊन ढिगारे साचले आहेत. विशेष म्हणजे ही वाहने सेवेत रूजू होऊन नव्वद दिवसांचा कालावधी उलटला आहे. महानगरातील विविध प्रभागांतील कचरा उचलून कंपोस्ट डेपोवर वहन करण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा कंत्राट कोणार्क इन्फ्रा या कंपनीस दिला आहे. पीक पॅाइंटवरून कचरा उचलून तो सुकळी, आकोली व कोंडेश्वर कंपोस्ट डेपोत नेण्यासाठी कंपनीने मोठे ट्रक लावले आहेत. नवीन वाहने असल्याने त्यांना नियमानुसार नंबरप्लेट असणे अनिवार्य आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने कायमस्वरूपी नंबरप्लेट मिळेस्तोवर तात्पुरत्या नंबर प्लेटवर वाहनांच्या आवागमनास परवानगी दिली होती. त्याची मुदत संपुष्टात आली असून आता विनानंबर धावणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. ऑक्सिजन पार्क येथे एका वाहनास साडेचार हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्यानंतर कंपनीने अकरा वाहनांचे परिक्रमण बंद केले आहे. यातील सहा वाहने प्रशांतनगर येथील मनपाच्या कार्यशाळेच्या आवारात, तर पाच वाहने ट्रान्स्पोर्टनगर येथील मैदानात उभी करण्यात आली आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) कायमस्वरूपी नंबर मिळेस्तोवर ही वाहने रस्त्यांवर धावू शकणार नाहीत. त्यामुळे कचरा उचलण्याचे काम पूर्णतः बंद पडले असून विविध प्रभागांत कचऱ्यांचे ढिगारे साचलेल्या स्थितीत पडून आहेत. दरम्यान नंबर मिळविण्याचे काम सुरू असून आरटीओंकडून ती लवकरच मिळणार आहेत, असे कंपनीच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे.

------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande