
बीड, 15 मार्च (हिं.स.)सुरत-चेन्नई राष्ट्रीय ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पासाठी आष्टी तालुक्यातील १९ गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन प्रस्तावित आहे. या संपादित जमिनीवरील फळबागा, वृक्ष लागवड, घरे, पत्र्याचे शेड, विहिरी आदी सर्व मालमत्तेचे योग्य व अचूक मूल्यांकन करून शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला मिळावा, यासाठी संबंधित प्रशासन व शेतकरी यांच्या संयुक्त आयोजित बैठकीस आमदार सुरेश धस उपस्थित होते
सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग हा आष्टी तालुक्यातील नांदूर ते पारगाव जोगेश्वरी या दरम्यानच्या सुमारे ३८ किमी अंतरावरून जाणार असून यासाठी अंदाजे २०० ते २२५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये ड्रोन सर्वेक्षण आणि सप्टेंबर २०२३ मध्ये नोटिफिकेशन प्रकाशित झाले होते तरी काही ठिकाणी सर्वेक्षणात त्रुटी राहिल्या असून फळबागांचे मूल्यांकन अपुरे झाले आहे.
यावर उपविभागीय अधिकारी वसीमा शेख यांनी रेडी रेकनर व प्रचलित बाजारभाव लक्षात घेऊन योग्य मोबदला दिला जाईल. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पासाठी अद्याप जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेतला नसला तरी शेतकऱ्यांना आतापर्यंतचे व्याज देण्याचा विचार असल्याचे स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या हक्काचा योग्य मोबदला मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले.
या बैठकीस पाटोदा विभागीय अधिकारी, नायब तहसीलदार श्री.पांडुरंग माढेकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तसेच नांदूर, बाळेवाडी, कुंबेफळ, खुंटेफळ, पुंडी, शिरापूर, निमगाव चोभा, धिर्डी, केळसांगवी, खानापूर, चिखली, वाळुंज, पारगाव जोगेश्वरी आदी गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis