गेवराईत फार्मर आयडीतील तांत्रिक दोष महिनाभरात दूर होणार - आ. विजयसिंह पंडित
बीड, 15 मार्च (हिं.स.)। गेवराई तालुक्यातील फार्मर आयडी मधील तांत्रिक दोष महिनाभरात दुरुस्त होणार असल्याची माहिती आमदार विजयसिंह पंडित यांनी दिली आहे. फार्मर आयडी हा शेतकऱ्यांचा एकमेव ओळख क्रमांक असून शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ घेण्यासाठी त
गेवराईत फार्मर आयडीतील तांत्रिक दोष महिनाभरात दूर होणार - आ. विजयसिंह पंडित


बीड, 15 मार्च (हिं.स.)। गेवराई तालुक्यातील फार्मर आयडी मधील तांत्रिक दोष महिनाभरात दुरुस्त होणार असल्याची माहिती आमदार विजयसिंह पंडित यांनी दिली आहे. फार्मर आयडी हा शेतकऱ्यांचा एकमेव ओळख क्रमांक असून शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ घेण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. महाडीबीटी वरील सर्व योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीकविमा, नैसर्गिक आपत्तीमधील नुकसान भरपाई, कर्जमाफी, पिकपेऱ्याची नोंद यांसह ई-सेवांसाठी त्याचा प्रामुख्याने उपयोग होतो.

सन २०२३-२४ मध्ये बीड जिल्ह्यात फार्मर आयडी नोंदणीचा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला. देशभरात निवडलेल्या केवळ सहा जिल्ह्यांमध्ये बीड जिल्ह्याचा समावेश होता, या माध्यमातून जिल्ह्यातील २.४१ लाख शेतकऱ्यांची नोंदणी होऊन त्यांना फार्मर आयडी मिळाला. मात्र यापैकी काही शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीवर १.९९ हेक्टर आर क्षेत्र दिसून आले, शासन योजनांचा लाभ घेण्यासाठी क्षेत्र मर्यादा २ हेक्टर असल्यामुळे अशा प्रकारच्या चुकीच्या नोंदीमुळे फार्मर आयडी घेतलेले शेतकरी शासन योजनांच्या रास्त लाभापासून वंचित राहिले.

गट नंबर, क्षेत्र, मोबाईल क्रमांक, गावाचे नाव आदींमध्ये चुकीच्या नोंदी झाल्यामुळे शेतकरी हैराण होते. शेकडो तक्रारी देऊनही फार्मर आयडी मध्ये तालुका आणि जिल्हा स्तरावर दुरुस्ती होत नव्हती. या बाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन आज या बाबत सभागृहात लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून चर्चा घडवून आणली.

राज्याचे लोकप्रिय कृषीमंत्री दत्तात्रयमामा भरणे यांनी याविषयी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत महिनाभरात सेंट्रल प्रोजेक्ट मॉनिटरींग युनिट, जमाबंदी आयुक्त, ॲग्री स्टॅकचे संचालक, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सर्व फार्मर आयडीमधील तांत्रिक त्रुटी दूर करणार असल्याचे आश्वासन दिले. बीड जिल्ह्यात सुमारे ५ लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची नोंदणी केली आहे. यापैकी लाखो शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीमध्ये तांत्रिक त्रुटी आहेत. या सर्व शेतकऱ्यांना या माध्यमातून नक्की दिलासा मिळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande