
पुणे, 15 मार्च (हिं.स.)राज्यातील सहकार क्षेत्रातील बँकिंग व्यवहार अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मोठे पाऊल उचलले आहे. ‘एअरपे’ या तंत्रज्ञान कंपनीसोबत सहयोग करार करून बँकेने स्वतंत्र यूपीआय स्वीकारकर्ता बँक म्हणून सेवा सुरू केली आहे.
स्वतःचे अधिकृत यूपीआय हँडल (upi@mscbank) असलेली देशातील पहिली राज्य शिखर बँक बनण्याचा मान मिळविला आहे, अशी माहिती राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.
राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकार क्षेत्रातील त्रिस्तरीय रचनेत महाराष्ट्र राज्य सहकारी बँक शिखर बँक म्हणून कार्यरत आहे. या व्यवस्थेत राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि सुमारे २१ हजारांहून अधिक विकास सोसायट्या सहभागी आहेत. सहकारातील या सर्व संस्थांना आधुनिक डिजिटल पेमेंट प्रणालीशी जोडण्यासाठी आणि त्यांचे बँकिंग व्यवहार अधिक गतिमान करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु